शिवसेना म्हणजे आयत्या बिळावर नागोबा; नारायण राणेंची बोचरी टीका
By देवेश फडके | Published: February 7, 2021 04:33 PM2021-02-07T16:33:59+5:302021-02-07T16:36:03+5:30
नारायण राणे यांनी उभारलेल्या लाइफटाइम रुग्णालयाचे लोकार्पण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नारायण राणे बोलत होते.
सिंधुदुर्ग : शिवसेना म्हणजे आयत्या बिळावर नागोबा असल्याची बोचरी टीका भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते आणि खासदार नारायण राणे यांनी केली आहे. नारायण राणे यांनी उभारलेल्या लाइफटाइम रुग्णालयाचे लोकार्पण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेदेखील उपस्थित होते. (BJP Leader Narayan Rane criticize Shiv Sena in Sindhudurg)
लाइफटाइम रुग्णालय आणि महाविद्यालय याचे भूमिपूजन केले तेव्हापासून खूप विरोध करण्यात आला. शिवसेनेकडून याला सर्वाधिक विरोध करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या ठिकाणी नवीन रुग्णालय उभारणार असून, या रुग्णालयासाठी ९०० कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. तिजोरीत एक पैसा नसताना ९०० कोटी रुपये देण्याचे जाहीर केले होते, असा दावा नारायण राणे यांनी यावेळी बोलताना केला.
विकासकामांना शिवसेनेचा विरोध
कोकणात विमानतळ होणार होते. तेव्हाही शिवसेनेने विरोध केला होता. यावेळी आंदोलन करणारी शिवसेनाच होती. विकासकामांनाही शिवसेनेने वेळोवेळी विरोध केला. मात्र, एकीकडे विकासकामांना विरोध करायचा आणि दुसरीकडे उद्घाटनांना आयत्या बिळावर नागोबासारखे येऊन बसायचे. यालाच शिवसेना असे म्हणतात, अशी बोचरी टीका नारायण राणे यांनी केली.
आम्ही तुमच्या मार्गावर चाललो असतो, तर शिवसेनाच उरली नसती; अमित शहांचा हल्लाबोल
डेअरिंगबाज माणसाकडून उद्घाटन
कितीही विरोध आणि वाद झाला तरी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे लोकार्पण करण्यात आले. आमच्या काही डॉक्टरांना विचारले की, उद्घाटन कोणाच्या हस्ते करायचे? तुम्ही ज्याप्रकारे मेडिकल कॉलेज सुरू करण्याचे धाडस केले. तेव्हा उद्घाटनाला डेअरिंगबाज माणूस हवा, अशी मागणी सर्वांनी केली. त्यामुळे दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना उद्घाटन कार्यक्रमाला येण्याची विनंती केली. अमित शहा यांनीही तत्काळ होकार दिला, असे नारायण राणे यांनी सांगितले.
आम्ही तुमच्या मार्गावर चाललो असतो, तर शिवसेनाच उरली नसती
बाळासाहेबांच्या सर्व वचनांना काशीत बुडवून शिवसेनेने सत्ता मिळवली. पण आम्ही तुमच्या मार्गाने चालणार नाही. आम्ही तुमच्या मार्गावर चाललो असतो, तर शिवसेनाच उरली नसती, असे विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे.