काम, धंदा ना व्यवसाय तरीही मर्सिडिजमधून फिरतात, मग पैसे कुठून आणतात; नारायण राणेंचे उद्धव ठाकरेंवर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 05:53 PM2024-04-02T17:53:50+5:302024-04-02T17:54:26+5:30
दिल्लीच्या रामलीला मैदानावर उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदी आणि भाजपावर टीका केली. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी मुंबईत नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यातून उद्धव ठाकरेंवर टीका केली.
मुंबई - Narayan Rane on Uddhav Thackeray ( Marathi News ) जनता उद्धव ठाकरेंना तडीपार करेल. डोळ्यासमोर ४० आमदार गेले तू काही करू शकला नाही. त्यामुळे तडीपार होण्याची वेळ तुझ्यावर आली. उद्धव ठाकरे काय आहेत हे मला माहिती आहे. मी बोललो तर मातोश्रीबाहेर येणं मुश्किल होईल. मोदींचे कौतुक करता येत नसेल तर करू नका, पण औरंगजेबाची तुलना करतो, आम्हाला काही लीला दाखवायला लागतील. पैसे घेऊन तिकीट दिल्याची माझ्याकडे यादी आहे. नगरपालिकेत चेअरमन बनवण्यासाठी पैसे घेतले जायचे. खासदार, आमदार तिकिटासाठी पैसे घेतले जायचे. एकदिवस पत्रकार परिषद घेऊन त्या लोकांना पुढे आणतो. पैसे घेऊन पद आणि तिकीट देण्याचं काम उद्धव ठाकरेंचं आहे. मी स्वत: बाळासाहेबांना तक्रार केली होती. आम्ही डोळ्याने पैसे मोजताना पाहिले आहे. काम, धंदा ना व्यवसाय तरी मर्सिडिजमधून फिरतात, मग पैसे कुठून आणतात? दुसरं मातोश्री कुठून उभी राहिली? असं सांगत भाजपा नेते नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला
मुंबईत पत्रकार परिषदेत नारायण राणे म्हणाले की, मुख्यमंत्री असताना केवळ २ दिवस मंत्रालयात गेले, आता रामलीला मैदानात जातात. इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहतात. खासदार ५, आमदार १६ अशी व्यक्ती त्या मैदानात जावून देशाच्या पंतप्रधानावर बोलते, राजकीय उंची आणि बौद्धिकता काय? भाजपाचे ३०३ खासदार आहेत. भाजपाला तडीपार करा असं बोलतात, कोरोनात औषधाचे पैसे खाणाऱ्याला तडीपार करू. ज्यांच्यावर पेडिंग केसेस आहेत त्यांना करू. उद्धव ठाकरेंनी मानसिक स्थिती बिघडली आहे. पंतप्रधानांवर बोलण्याची पात्रता नाही. मी वैयक्तिक टीका करत नाही. खालच्या पातळीवर विषय नेत नाही. परंतु हे लोक मोदींना अरेतुरेच्या भाषेत बोलतात. जास्त बोलाल तर ते सहन करणार नाही. रामलीला मैदानात जी सभा घेतली ती दारूण पराभव समोर दिसत आहेत त्यामुळे बोलत होते. विरोधकांच्या पराभवाची गॅरंटी म्हणून रामलीला मैदानाची सभा होती असं त्यांनी म्हटलं.
तसेच उद्धव ठाकरेंचे ५ पेक्षा जास्त खासदार येणार नाहीत, लोकसभेनंतर संजय राऊतही दिसणार नाही. हा शरद पवारांचा प्रामाणिक माणूस आहे. शिवसेना संपण्याला संजय राऊत कारण आहेत. मोदींबाबत राऊतांनी बोलू नये. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोदींचं कौतुक करतात, अनेक देशांच्या अध्यक्षांनी पंतप्रधान मोदींचं कौतुक आणि प्रशंसा केली. अर्थव्यवस्थेत भारत पुढे आला आहे. देशाचा जीडीपी वाढलो. २०३० पर्यंत जगात तिसरी अर्थव्यवस्था भारताची होईल. गेल्या ९ वर्षात ५४ योजना गरिबांसाठी जाहीर केली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रासाठी काय केले? कुठला विकास आराखडा बनवला, कुठे काही योजना बनवली? उद्धव ठाकरेंसारखा बालिश माणूस पाहिला नाही. तुमचं राजकारण संपलं आहे. आता मराठी माणूस तडीपार होणार नाही तर मातोश्रीचा उद्धव ठाकरे तडीपार होण्याची वेळ आली आहे असंही राणेंनी सांगितले.
दरम्यान, काँग्रेसच्या एका नेत्याकडे ३५० कोटी रोकड सापडली. नोटा मोजताना मशिन बंद पडली. रामलीला मैदानावर विरोधी पक्ष एकत्र जमून दु:ख व्यक्त करत होते. देशात कायदे, लोकशाही आहे. अरविंद केजरीवाल यांना का जेलमध्ये टाकले? त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे राहुल गांधी समर्थन करतात. मोदींनी गेल्या ९ वर्षात जे काम केले, भारताला जागतिक पातळीवर नाव मिळवून दिलं. त्यांच्याविरोधात बोलतात. नितीन गडकरी रस्ते बनवतात, त्याचा दर्जा तपासण्याचं काम राहुल गांधी करतात असं म्हणत नारायण राणेंनी भारत जोडो यात्रेवर टीका केली.
सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघ भाजपाचाच
सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघ हा भाजपाचाच, तिथे उमेदवार कोण असेल ते पक्ष ठरवेल. कुणीही लुडबूड करू नये. मी तिकीट मागितले नाही. मला न मागता भरपूर मिळालंय. भाजपाचा हा मतदारसंघ आहे. भाजपाने जर माझे नाव जाहीर केल्यास मी लढणार आणि जिंकणार. प्रत्येक पक्षाला बैठक बोलवण्याचा अधिकार आहे. शिवसेनेचे किती कार्यकर्ते आहेत? भाजपाचे जिल्हा परिषद, नगरपालिका एवढी ताकद असताना तो मतदारसंघ अजिबात सोडणार नाही. विनायक राऊत हे शिवसेनेचे आहेत का? उमेदवार कोण आहे? असं म्हणत नारायण राणेंनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर टीका केली.