ठाकरे सरकारने पहिल्या दिवसापासून चुना लावण्याचा कारखाना सुरु केला: निलेश राणे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 09:58 AM2019-12-23T09:58:15+5:302019-12-23T10:03:47+5:30
सरसकट कर्जमाफीचा शब्द सुद्धा ठाकरे सरकारने पाळला नाही. तसेच दोन लाखाची कर्जमाफीची सुद्धा स्पष्टता नसल्याचा आरोप निलेश राणेंनी केला आहे.
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी मोठी घोषणा केली. यानुसार राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याची 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी होणार आहे. कर्जमाफीची ही घोषणा केल्यानंतर मात्र विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सरकारने शब्द पाळला नसल्याचा आरोप केला आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलेली कर्जमाफीची घोषणा म्हणजे शेतकऱ्यांना चुना लावण्याचा प्रकार असल्याची टीका भाजप नेते निलेश राणे यांनी केली आहे.
नागपुरात झालेल्या हिवाळी अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा लावून धरत विरोधकांनी सरकाराला घेरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र अधिवेशनात कर्जमाफी होणार नसल्याचे संकेत सत्ताधारी पक्षाकडून देण्यात येत होते. परंतु अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी 'सर्जिकल स्ट्राइक' करत शेतकऱ्यांचं सप्टेंबर 2019 पर्यंतचं दोन लाख रुपयांचं कर्ज माफ करण्याची घोषणा केली. त्यांनतर राजकीय वर्तुळातून या विषयी विविध प्रतिक्रिया येत आहे.
तर सरकराने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या मुद्यावरून निलेश राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. "इतर कुठला कारखाना ठाकरे सरकार उभारणार की नाही हे माहीत नाही, पण चुना लावायचा कारखाना पहिल्या दिवसापासून सुरु केला" असल्याचा खोचक टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.
इतर कुठला कारखाना ठाकरे सरकार उभारणार की नाही माहीत नाही पण चुना लावायचा कारखाना पहिल्या दिवसापासून सुरु केला. अतिवृष्टी मुळे झालेली नुकसान भरपाई नाही, सरसकट कर्जमाफी नाही, २ लाख कर्जमाफीची स्पष्टता नाही.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 22, 2019
याच बरोबर निलेश राणेंनी नुकसान भरपाई व सरसकट कर्जमाफीचा मुद्दा सुद्धा उपस्थित केला. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांना नुकसानभरपाई मिळणे अपेक्षित असताना या सरकराने अजूनही नुकसानभरपाई दिली नाही. सरसकट कर्जमाफीचा शब्द सुद्धा ठाकरे सरकारने पाळला नाही. तसेच दोन लाखाची कर्जमाफीची सुद्धा स्पष्टता नसल्याचा आरोप निलेश राणेंनी केला आहे.