पोलिसांना मारणाऱ्यांना शेतकरी म्हणायचं का?; निलेश राणेंचा संतप्त सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2021 12:35 PM2021-01-27T12:35:19+5:302021-01-27T12:40:00+5:30
मंगळवारी शेतकरी आंदोलनानं हिंसक होत पोलिसांवरही केला होता हल्ला
दिल्लीतशेतकरी आंदोलकांनी आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागल्याने प्रजासत्ताक दिनाला गालबोट लागले. दिल्लीतील विविध ठिकाणी शेतकरी आंदोलक आणि पोलिसांमध्ये हिंसक झटापटी झाल्या. दरम्यान, देशाच्या राजधानीचा मानबिंदू असलेल्या लाल किल्लाही हिंसक आंदोलनामधून सुटला नाही. दरम्यान, लाल किल्ल्यात हिंसक आंदोलकांनी सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या पोलिसांवर केलेल्या हल्ल्याचा एक भयानक व्हिडीओ समोर आला होता. हा व्हिडीओ शेअर करत भाजपा नेते निलेश राणे यांनी 'पोलिसांना मारणाऱ्यांना शेतकरी म्हणायचं का?' असा संतप्त सवाल केला आहे.
"पोलिसांना मारणाऱ्यांना शेतकरी म्हणायचं? पोलिसांना पाहिजे तेव्हा त्यांनी जागा रिकामी केली असती. पण आजपर्यंत माणुसकी दाखवली. पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालणं हे कुठलाही शेतकरी करू शकत नाही. या जमावाला कायदा बदलून हवा की कायदा बिघडवायचा आहे?," असा सवाल निलेश राणे यांनी केला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली संतप्त प्रतिक्रिया दिली.
पोलिसांना मारणाऱ्यांना शेतकरी म्हणायचं?? पोलिसांना पाहिजे तेंव्हा त्यांनी जागा रिकामी केली असती पण आज पर्यंत माणुसकी दाखवली. पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालणं, हे कुठलाही शेतकरी करू शकत नाही. या जमावाला कायदा बदलून हवा की कायदा बिघडवायचा आहे??? pic.twitter.com/GHGgK7XQ0C
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) January 27, 2021
काय आहे प्रकरण?
दिल्लीतील ट्रॅक्टर रॅलीदरम्यान शेतकऱ्यांचा एक मोठा हिंसक जमाव लाल किल्ल्यावर चाल करून आला. या जमावाने लाल किल्ल्यातील महत्त्वाच्या जागा ताब्यात घेऊन तिथे धार्मिक तसेच इतर झेंडे फडकवले. तसेच सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांवरही आंदोलकांनी हल्ला केला. यातील एक व्हिडीओ आता व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये लाल किल्ल्यावर आंदोलक जमाव पोलिसांवर हल्ला करताना दिसत होता. तसंच पोलीस आपला जीव वाचवण्यासाठी लाल किल्ल्याच्या भिंतीवरून उड्या मारताना दिसत होते.
दरम्यान, दिल्लीत झालेल्या हिंसक आंदोलनामध्ये दंग्यामध्ये अनेक पोलीस जखमी झाले होते. यापैकी अनेक पोलिसांना गंभीर दुखापती झाल्या असून, त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. "अॅडिशनल (ईस्ट) डीसीपी मंजीत यांच्यावर ट्रॅक्टर चालवण्याचा प्रयत्न झाला. सुरक्षा दलांनी प्रसंगावधान राखून त्यांना वाचवले. अन्यथा मोठा अपघात झाला असता. याशिवाय अन्य एका पोलीस अधिकाऱ्याला दुखापत झाली आहे. तसेच अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत," अशी माहिती दिल्ली पोलिसांचे सह-आयुक्त आलोक कुमार यांनी सांगितलं.