आपला तो बाब्या, दुसऱ्याचा तो...; निलेश राणेंची शिवसेनेवर जोरदार टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2020 10:52 AM2020-12-30T10:52:35+5:302020-12-30T10:58:25+5:30
Nilesh Rane : शिवसेना कार्यालय उभारणीसाठी मदत निधी घेतला जात असल्याचा एक फोटो शेअर करत भाजपा नेते निलेश राणे यांनी साधला शिवसेनेवर निशाणा.
अयोध्येतील राममंदिरासाठी संक्रांतीपासून वर्गणीचे काम सुरू होणार आहे. मकर संक्रांतीपासून चार लाखांहून अधिक स्वयंसेवक १२ कोटी कुटुंबांशी संपर्क साधतील. हे स्वयंसेवक गावागावांत जातील, असं श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपतराय यांनी सांगितलं होतं. यानंतर शिवसेनेनं सामनाच्या संपादकीयमधून यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. त्यानंतर आता शिवसेना कार्यालय उभारणीसाठी मदत निधी घेतला जात असल्याचा एक फोटो शेअर करत भाजपा नेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
"राम मंदिर उभारण्यापेक्षा जिथे वर्गणी जमा होते ते कार्यालय उभं राहणं जास्त गरजेचे आहे असं काहींना वाटतं. राम मंदिरसाठी मागितली तर वर्गणी चुकीची. पण स्वतःच्या शाखेसाठी मागितली तर ते चालतं. आपला तो 'बाब्या' दुसऱ्याचा तो 'कारटा'," असं म्हणत राणे यांनी शिवसेनेवर टीका केली. त्यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर करत यावर टीका केली आहे. वाडा शहर शाखा, शिवसेना कार्यालय उभारणीसाठी मदतनीधी असं त्या फोटोवर लिहिण्यात आलं आहे. यापूर्वी शिवसेनेनं सामनाच्या संपादकीयमधून राम मदिरांसाठी घेतल्या जात असलेल्या वर्गणीवर टीका केली होती.
काय म्हटलं होतं शिवसेनेनं?
राम अयोध्येचा राजा होता. त्याच्या मंदिरासाठी युद्ध झाले. शेकडो कारसेवकांनी आपले रक्त सांडले, बलिदान दिले. त्या अयोध्येच्या रामाचे मंदिर वर्गणीतून बांधायचे? मुळात श्रीरामाचे भव्य मंदिर हे एखाद्या राजकीय पक्षाच्या राजकीय लाभासाठी बनत नसून ते देशाच्या हिंदू अस्मितेची पताका फडकविण्यासाठी बांधले जात आहे. चार लाख स्वयंसेवक हे मंदिराच्या वर्गणीनिमित्ताने संपर्क अभियान राबविणार आहेत. हे संपर्क अभियान म्हणजे रामाच्या आड २०२४ चा निवडणूक प्रचार आहे, असा आरोप शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून केला आहे. तसेच, रामाच्या नावाचा राजकीय प्रचार केव्हा तरी थांबवायलाच हवा. मंदिर निर्माणानंतर निवडणूक प्रचारात राम नको, फक्त विकास असायला हवा. पण तसे दिसत नाही. वनवास संपला तरी श्रीरामाची अडवणूक सुरूच आहे. हे राम!, असंही शिवसेनेनं म्हटलं होतं.
वर्गणीच्या नावाखाली प्रचारक
देशातून चार लाख स्वयंसेवकांची नेमणूक वर्गणीच्या कामासाठी झाली असेल तर त्या स्वयंसेवकांची पालक संघटना कोणती, हे स्पष्ट झाले तर बरे होईल. वर्गणीच्या नावाखाली हे चार लाख स्वयंसेवक एखाद्या पक्षाचे राजकीय प्रचारक म्हणून घरोघर जाणार असतील तर मंदिरासाठी रक्त सांडलेल्या प्रत्येक आत्म्याचा तो अवमान ठरेल. मंदिराचा लढा हा राजकीय नव्हता. तो समस्त हिंदू भावनांचा उद्रेक होता. त्याच उद्रेकातून पुढे हिंदुत्वाचा वणवा पेटला व आजचा भाजप त्याच वणव्यावर भाजलेल्या पोळ्या खात आहे. अर्थात आम्हाला त्याचे दुःख नाही. शिवसेनेने मंदिरनिर्माणासाठी एक कोटीचा निधी सगळय़ात आधी रामलल्लाच्या बँक खात्यात जमा केला. याकामी अयोध्येत रामलल्लाच्या नावे बँक खाते उघडले असून त्यात जगभरातील रामभक्त सढळ हस्ते मदत करीत आहेत. एव्हाना मंदिरासाठी लागणारा ३०० कोटींचा निधी प्रभू श्रीरामांच्या नावे असलेल्या बँक खात्यात जमाही झाला असेल, असंही संपादकीयमध्ये नमूद करण्यात आलं होतं.