"रोहित पवार शेतकऱ्यांना भडकवण्याचा प्रयत्न करतायत"; नीलेश राणेंची टीका
By देवेश फडके | Updated: January 25, 2021 15:05 IST2021-01-25T15:02:35+5:302021-01-25T15:05:26+5:30
भाजप नेते नीलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली आहे. रोहित पवार शेतकऱ्यांना भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा पलटवार नीलेश राणे यांनी केला आहे.

"रोहित पवार शेतकऱ्यांना भडकवण्याचा प्रयत्न करतायत"; नीलेश राणेंची टीका
मुंबई : केंद्रीय कृषी कायद्याविरोधातील आंदोलन अधिक तीव्र करण्यात आले असून, शेतकऱ्यांचा मोर्चा आझाद मैदानात दाखल झाला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते नीलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली आहे. रोहित पवार शेतकऱ्यांना भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा पलटवार नीलेश राणे यांनी केला आहे.
शेतकऱ्यांना समजून घेण्यास केंद्र सरकार कमी पडत आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले होते. त्यावर पलटवार करताना नीलेश यांनी रोहित पवार यांच्यावर टीका केली आहे. नीलेश राणे यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे.
''नकलीपणा काय असतो बघायचं असेल तर हे वाचा. जे रोहित पवार शेतकरी कायद्यांचा संदर्भ देऊन शेतकऱ्यांना भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत त्याच रोहित पवारांची स्वतःची कंपनी शेतकऱ्यांना करार करण्याचे फायदे सांगत आहेत'', असे ट्विट नीलेश राणे यांनी केले आहे.
नकलीपणा काय असतो बघायचं असेल तर हे वाचा. जे रोहित पवार शेतकरी कायद्यांचा संदर्भ देऊन शेतकऱ्यांना भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत त्याच रोहित पवारांची स्वतःची कंपनी शेतकऱ्यांना करार करण्याचे फायदे सांगत आहेत. pic.twitter.com/dIx5fEhEcx
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) January 24, 2021
या ट्विटमध्ये एक फोटो शेअर केला असून, यामध्ये कंत्राटी शेतीचे फायदे सांगण्यात आले आहेत. बारामती अॅग्रोचा हा फ्लेक्स असून, त्यात करार पद्धतीने शेती करण्याचे फायदे, वर्षभर हमी भावाने खरेदी, शेतकऱ्याला क्रेडिटवर बेबीकॉर्न बियाणे आणि मिरचीच्या रोपांची पुरवठा, शून्य टक्के वाहतूक, विविध पिकांसाठी तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन, असे काही मुद्दे यात मांडण्यात आले आहेत.
दरम्यान, अखिल भारतीय किसान सभेचा मोर्चा रविवारी रात्री मुंबईत दाखल झाला आहे. शेकडो किलोमीटरचे अंतर कापून हजारो शेतकरी मुंबईत दाखल झाले आहेत. केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या ६० दिवसांपासून दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रात अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला आहे. राज्यभरातील विविध जिल्ह्यांमधील शेतकरी मोठ्या संख्येने या महामोर्चात सहभागी झालेले आहेत.