Maharashtra Political Crisis: ठाकरे सरकार गेलं, पण वार-पलटवार सुरूच; नितेश राणेंचं संजय राऊतांना चोख प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 03:06 PM2022-06-30T15:06:47+5:302022-06-30T15:07:55+5:30
शिवसेनेचे मातब्बर नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून महाराष्ट्रातील राजकारण जबरदस्त तापले आहे. यातच नेत्यांचे एक-मेकांवर वार-पलटवार सुरूच ...
शिवसेनेचे मातब्बर नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून महाराष्ट्रातील राजकारण जबरदस्त तापले आहे. यातच नेत्यांचे एक-मेकांवर वार-पलटवार सुरूच आहेत. काल उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. यानंतर, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बंड केलेल्या आमदारांवर निशाणा साधला. आपल्याच माणसांनी खंजीर खुपसला, असे त्यांनी म्हटले होते. याला उत्तर देताना भाजप आमदार नितेश राणे मैदानात उतरले आहेत. त्यांनी एक स्केच ट्विट करत राऊतांना त्यांच्याच स्टाईलने प्रत्युत्तर दिले आहे.
नितेश राणेंनी दिले उत्तर -
भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विटरवर एक स्केच शेअर केले आहे. हे स्केच शेअर करताना त्यांनी 'रिटर्न गिफ्ट', असे लिहिले आहे. यात त्यांनी शिवसेनेच्या बाणाला शिंदेंच्या बाणाने उत्तर दिले आहे. तत्पूर्वी, शिवसेना खासदार राऊत यांनी खंजिर वाले एक स्केच ट्विट करत बंड केलेल्या आमदारांवर निशाणा साधला होता. यासोबत त्यांनी 'नेमके हेच घडले!', असे लिहिले होते. आता नितेश राणे यांनी राऊतांना त्यांच्याच अंदाजात उत्तर दिले आहे. याच बरोबर, या स्केचवर नितेश राणे यांनी 'कर्मा रिटर्न्स', असेही लिहिले आहे.
Return gift pic.twitter.com/tXEd9WA0vC
— nitesh rane (@NiteshNRane) June 30, 2022
एकनाथ शिंदे यांना केंद्राकडून 'झेड' दर्जाची सुरक्षा -
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. शिंदेंसह जवळपास 50 आमदारांनी ठाकरे सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. राज्यात शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट आहे. हे लक्षात घेत, एकनाथ शिंदे यांना केंद्राकडून 'झेड' दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.
देवेंद्र फडणवीस उद्या घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ -
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर, आता भाजपचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यातील नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्रिपदाची धुरा देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर तर उपमुख्यमत्रिपदाची धुरा एकनाथ शिंदे यांच्या हाती येणार आहे. दोघांच्याही शपथविधीचा मुहुर्त ठरला असून उद्या म्हणजेच शुक्रवारी हा शपथविधी पार पडण्याची शक्यता आहे.