फक्त बोलून अंतरंग भगवं होत नाही; नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 01:33 PM2020-01-24T13:33:00+5:302020-01-24T13:59:17+5:30

राज ठाकरेंचं कौतुक; उद्धव ठाकरेंचा तिखट शब्दांत समाचार

bjp leader nitesh rane hits out at cm uddhav thackeray praises mns chief raj thackeray | फक्त बोलून अंतरंग भगवं होत नाही; नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

फक्त बोलून अंतरंग भगवं होत नाही; नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

Next

मुंबई: बाळासाहेब ठाकरेंचे विचार विसरलेली शिवसेना पुढील निवडणुकांमध्ये कुठेही दिसणार नाही, अशी घणाघाती टीका भाजपाचे आमदार नितेश राणेंनी केली आहे. बाळासाहेबांचा वारसा मनसे प्रमुख राज ठाकरेच पुढे नेऊ शकतील. राज यांची वैचारिक भूमिका हिंदुत्ववादीच असल्यानं त्यांनी काल मांडलेल्या विचारांचं आश्चर्य वाटलं नाही, असंदेखील नितेश राणे म्हणाले. नितेश राणेंनी राज यांच्या भूमिकेचं स्वागत करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा जोरदार समाचार घेतला. फक्त बोलून अंतरंग भगवं होत नाही, असा टोला राणे यांनी लगावला. 

बाळासाहेबांना मानणारा मोठा वर्ग राज्यात आहे. कित्येक शिवसैनिक बाळासाहेबांमुळे मतदान करतात. बाळासाहेबांना मानणाऱ्या या कडवट शिवसैनिकांना उद्धव ठाकरेंनी घेतलेली भूमिका आवडलेली नाही. आज शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. मात्र बाळासाहेबांनी दिलेला विचार शिवसेनेत राहिलेला नाही. बाळासाहेबांच्या विचारांचा सातत्यानं अपमान सुरू आहे, अशा शब्दांत नितेश राणेंनी शिवसेनेला लक्ष्य केला. 

माझं अंतरंग भगवं असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगतात. मात्र केवळ बोलून अंतरंग होत नसतं, असा टोला त्यांनी लगावला. काल बाळासाहेब ठाकरेंची जयंती होती. त्या निमित्तानं गांधी घराण्यातल्या एका व्यक्तीनं तरी बाळासाहेबांना अभिवादन केलं का, असा सवाल राणेंनी उपस्थित केला. शिवसेनेचा कारभार दिल्लीच्या इशाऱ्यावर सुरू आहे. संजय राऊत तर सकाळी केलेली विधानं संध्याकाळी मागे घेत आहेत, असंदेखील ते पुढे म्हणाले. 

शिवसेनेनं बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा केली आहे. त्याचे परिणाम त्यांना आगामी निवडणुकांमध्ये पाहायला मिळतील. येत्या निवडणुकांमध्ये शिवसेना कुठेही दिसणार नाही, अशा शब्दांत नितेश राणेंनी शिवसेनेला लक्ष्य केलं. यावेळी त्यांनी राज ठाकरेंवर स्तुतीसुमनं उधळली. राज ठाकरे खऱ्या अर्थानं बाळासाहेबांच्या विचारांना पुढे नेत आहेत. तेच बाळासाहेबांचे खरे वारसदार आहेत, असं म्हणत त्यांनी राज यांचं कौतुक केलं.

Web Title: bjp leader nitesh rane hits out at cm uddhav thackeray praises mns chief raj thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.