"मुख्यमंत्री असताना बाळासाहेबांचे स्मारक बांधण्याचे सोडून याकूब मेमनची कबर सजवत बसले, आता…”
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2022 04:08 PM2022-09-08T16:08:38+5:302022-09-08T16:09:39+5:30
याकूबची कबर मार्बल आणि लायटिंगनं सुशोभीकरण करण्यात आली आहे. यावरून भाजपानं तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे
१९९३ बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेननला ७ वर्षापूर्वी मुंबईच्या बडा कब्रिस्तान इथं दफन करण्यात आले होते. मात्र त्याच्या कबरीवरून आता नवा वाद निर्माण झाला आहे. याकूबची कबर मार्बल आणि लायटिंगनं सुशोभीकरण करण्यात आली आहे. त्यावरून भाजपानं मागील महाविकास आघाडी सरकारला दोषी धरत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. दरम्यान, भाजप नेते नितेश राणे यांनीदेखील यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय.
“दोन वर्षे मुख्यमंत्री असताना बाळासाहेबांचे स्मारक बांधण्याचे सोडून याकूब मेमनची कबर सजवत बसले आणि आता म्हणे माझ्या बापाच्या नावाने मतं मागू नका!!.” असं म्हणत नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंवर टीकेचा बाण सोडला.
दोन वर्षे मुख्यमंत्री असताना बाळासाहेबांचे स्मारक बांधण्याचे सोडून..
— nitesh rane (@NiteshNRane) September 8, 2022
याकूब मेमन ची कबर सजवत बसले..
आणि आता म्हणे माझ्या बापाच्या नावाने मतं मागू नका!!
बावनकुळेंनीही साधला निशाणा
याकूबची कबर सुशोभिकरणासाठी ज्यांनी मदत केली त्यांचे नावे समोर आणा. हे देशद्रोही कृत्य असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. तत्कालीन सरकार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात होते. कट्टर हिंदुत्ववादी स्वत:ला म्हणवणारे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदासाठी तडजोड का केली? याचं स्पष्टीकरण जनतेला दिले पाहिजे. या प्रकारासाठी सरकारमध्ये कोण कोण समाविष्ट होते ते समोर आलं पाहिजे असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.