जलयुक्त शिवार योजना मी खूप आधीच राबवलीय; पंकजा मुंडेंचा पुन्हा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2019 06:31 PM2019-12-14T18:31:51+5:302019-12-14T19:35:14+5:30
पंकजा मुंडेंचं राज्य नेतृत्त्वावर पुन्हा एकदा शरसंधान
मुंबई: ग्रामविकास मंत्री म्हणून काम करताना अनेक अडथळे आले. ते खातं आव्हानात्मक होतं. मात्र साधी आमदार असतानाही मी जनहिताची अनेक कामं केलेली आहेत. जलयुक्त शिवार योजना मी खूपच आधीच राबवली होती, अशा शब्दांमध्ये भाजपा नेत्या पंकजा मुंडेंनी राज्यातील पक्ष नेतृत्त्वाला पुन्हा एकदा टोला लगावला. साधी आमदार असतानाच मी जलयुक्त शिवार योजनेची कामं केली. त्यानंतर सरकारमध्ये गेल्यावरदेखील त्या योजनेवर काम सुरू ठेवलं, असंदेखील त्या पुढे म्हणाल्या.
जलसंधारणाची कामं करताना गुजरात पॅटर्न राबवला. त्याचा बराच फायदा झाला. मात्र अनेकदा प्रसिद्धीचे नकारात्मक परिणामदेखील सहन करावे लागतात. मलादेखील याचा अनुभव आला, असं पंकजा म्हणाल्या. मी पक्षावर नाराज नाही, याचाही त्यांनी पुनरुच्चार केला. मी काही दिवसांपूर्वी फेसबुकवर पोस्ट लिहिली, त्यामागे कोणतीही अस्वस्थता नव्हती. मी नाराज नव्हते, अस्वस्थ नव्हते. मात्र फेसबुक पोस्ट लिहिल्यानंतर १ डिसेंबर ते १२ डिसेंबर या कालावधीत ज्या वावड्या उठल्या त्यामुळे मी अस्वस्थ झाले, असं त्यांनी सांगितलं.
मी पॉवरगेम खेळते आहे, मला विरोधी पक्षनेते पद हवं आहे, त्यासाठी माझ्याकडून दबाव निर्माण केला जात आहे, अशा चर्चा रंगल्या होत्या. त्या सगळ्या चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी मी कोअर कमिटीच्या सदस्यत्वाचा राजीनामा देते अशी घोषणा केल्याचं पंकजा यांनी स्पष्ट केलं. व्यक्त होणं आणि पक्षविरोधी असणं या वेगळ्या गोष्टी आहे. माझ्या अस्वस्थतेची कारणं वेगळी आहेत. माझ्यावर अन्याय झाला असं मी कधीही म्हटलेलं नाही. विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव मी स्वीकारला असून आता शून्यापासून पुन्हा एकदा कामाला सुरुवात करणार आहे, असं म्हणत त्यांनी स्वत:ची पुढील वाटचाल स्पष्ट केली.