नाराज पंकजा मुंडे 'माधवबरा' मार्गानं जाणार; उद्या मोठी घोषणा होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 03:33 PM2019-12-11T15:33:39+5:302019-12-11T16:00:17+5:30

पंकजा मुंडेंकडून भाजपावर दबाव टाकण्याचा प्रयत्न

bjp leader pankaja munde likely to form new social Organization tomorrow | नाराज पंकजा मुंडे 'माधवबरा' मार्गानं जाणार; उद्या मोठी घोषणा होणार?

नाराज पंकजा मुंडे 'माधवबरा' मार्गानं जाणार; उद्या मोठी घोषणा होणार?

googlenewsNext

बीड: भाजपावर नाराज असलेल्या पंकजा मुंडे उद्या गोपीनाथ गडावरुन मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. भाजपाचे दिवंगत नेते आणि माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांनी माळी, धनगर, वंजारी समुदायाला एकत्र आणत 'माधव'चा प्रयोग केला होता. आता पंकजा या समुदायांसोबतच बंजारा आणि राजपूत यांचीदेखील मोट बांधण्याच्या प्रयत्नात असल्याचं समजतं. भाजपावर दबाव आणण्यासाठी पंकजा मुंडे 'माधवबरा' (माळी, धनगर, वंजारी, बंजारा, राजपूत) या समुदायांना एकत्र आणू शकतात. उद्या गोपीनाथ गडावरुन याबद्दलची घोषणा होऊ शकते. 'एबीपी माझा'नं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

उद्या गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे मेळावा घेणार आहेत. या मेळाव्याला उपस्थित राहण्याचं आवाहन त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी ‘आमचं ठरलंय’ या नावाखाली सोशल मीडियामध्ये सुरु केलेल्या मोहिमेमुळे मुंडे समर्थक कार्यर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. मात्र पंकजा मुंडे यांचं काही ठरलं नसून त्या पक्षातच राहतील, असा विश्वास त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. 

काल मुंबईत भाजपचे आणखी एक नाराज नेते एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतली. यामुळे गोपीनाथ गडावर गुरुवारी होणाऱ्या मेळाव्यात त्या कोणती भूमिका घेणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र, मुंडे यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना काही संदेश आहे का, याचा कानोसा घेतला असता काही कार्यकर्त्यांनी त्या पक्षांतर करणार नाहीत, असा असा ठाम विश्वास व्यक्त केला.

पंकजा मुंडे यांच्या सोशल मीडियावरील पोस्टनंतर राजकारण ढवळून निघालं आहे. याचदरम्यान पंकजा मुंडे यांनीही पक्षांतर करणं रक्तात नसल्याचं स्पष्ट केलं होतं. मात्र, त्यानंतरही एकनाथ खडसे यांच्यासह इतर ओबीसी नेत्यांच्या चाललेल्या बैठका, संवाद यामुळे पंकजा मुंडे या एकनाथ खडसे यांच्यासह पक्षांतर करण्याच्या चर्चेनं जोर धरला. याविषयी औरंगाबाद आणि बीडमधील त्यांच्या जवळच्या कार्यकर्ते आणि नेत्यांशी संवाद साधला असता पंकजा या पक्षांतर करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे त्या माळी, धनगर, वंजारी, बंजारा, राजपूत समाजाची मोट बांधून एका संघटनेची घोषणा करतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. 
 

Web Title: bjp leader pankaja munde likely to form new social Organization tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.