भाजपानं विधान परिषद नाकारली; पंकजा मुंडे मध्यरात्री ट्विट करून म्हणाल्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2020 09:41 AM2020-05-09T09:41:03+5:302020-05-09T10:38:22+5:30
विधानपरिषदेसाठी भाजपाकडून नव्या चेहऱ्यांना संधी; माजी मंत्र्यांना उमेदवारी नाही
मुंबई: विधान परिषदेच्या २१ मे रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने माजी खासदार रणजीतसिंह मोहिते पाटील, धनगर समाजाचे नेते गोपिचंद पडळकर, नागपूरचे माजी महापौर व भाजपचे शहराध्यक्ष प्रवीण दटके आणि नांदेडचे डॉ. अजित गोपछेडे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे माजी मंत्री एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना धक्का बसला आहे.
काल दुपारी भाजपानं विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा केली. त्यानंतर एकनाथ खडसेंनी त्यांची नाराजी बोलून दाखवली. मात्र पंकजा मुंडेंनी यावर प्रतिक्रिया दिली नव्हती. मध्यरात्री एकच्या सुमारास पंकजा मुंडेंनी यावर ट्विट करून भाष्य केलं. 'आईंना, ताईंना फोन करून दुःख व्यक्त करताय ठीक आहे. पण वाघांनो असं रडताय काय मी आहे ना, 'तुमच्यासाठी मी आणि माझ्यासाठी तुम्ही' बस साहेबांचे आशिर्वाद आहेत दिवसभर फोन उचलले नाही कुणाकुणाला उत्तर देऊ ?या निर्णयाचा मला धक्का अजिबात बसला नाही. भाजप च्या त्या चार ही उमेदवारांना आशिर्वाद!,' असं पंकजा यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
आईंना,ताईंना फोन करून दुःख व्यक्त करताय ठीक आहे पण वाघांनो असं रडताय काय मी आहे ना ,'तुमच्यासाठी मी आणि माझ्यासाठी तुम्ही' बस साहेबांचे आशिर्वाद आहेत दिवसभर फोन उचलले नाही कुणाकुणाला उत्तर देऊ ?या निर्णयाचा मला धक्का अजिबात बसला नाही. भाजप च्या त्या चार ही उमेदवारांना आशिर्वाद!
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) May 8, 2020
तत्पूर्वी एकनाथ खडसेंनी विधान परिषदेची उमेदवारी न मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. विधानपरिषदेसाठी माझं, पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाची शिफारस दिल्ली दरबारी झाल्याचं आम्हाला सांगण्यात आलं होतं. मात्र, आमच्याऐवजी नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आल्याचं समजलं, अशा शब्दांत एकनाथ खडसेंनी नाराजी व्यक्त केली. गोपीचंद पडळकर यांना विधानपरिषदेचं तिकीट देण्यात आल्याबद्दलही खडसेंनी नाराजी बोलून दाखवली. पडळकर हे धनगर समाजाचे नेते असून त्यांनी नरेंद्र मोदींच्या सभांवर बहिष्कार टाकला होता. मात्र, भाजपात आल्यानंतर आता त्यांना संधी देण्यात आल्याचे सांगत खडसेंनी पक्षाच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली.
एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना विधान परिषदेचं तिकीट नाकारण्यात आल्यानं त्यांना राजकीय पुनर्वसनासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. खडसे हे फडणवीस यांचे विरोधक मानले जातात, तर पंकजा मुंडे यांनीही अप्रत्यक्षपणे फडणवीस यांच्यावर मध्यंतरी टीका केली होती. फडणवीस मुख्यमंत्री असताना तावडे हे कधीही त्यांचे निकटवर्ती नव्हते. मात्र बावनकुळे हे फडणवीसांचे जवळचे मानले जातात. या चौघांना संधी द्यावी की विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेला शब्द पाळत पडळकर, मोहिते पाटील यांना संधी देऊन अन्य दोन जागांसाठी पक्षातील नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी असे पर्याय होते. त्यातील दुसरा पर्याय पक्षाने निवडला. प्रस्थापित नेत्यांऐवजी नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली.
भाजपच्या प्रदेश नेतृत्वाने मात्र खडसे, मुंडे, तावडे, बावनकुळे यांच्यापैकी किमान दोघांना तरी संधी द्यावी असा आग्रह केंद्रीय नेतृत्वाकडे धरला होता. मात्र पक्षनेतृत्वाने तो अमान्य केला अशी माहिती सूत्रांनी दिली. फडणवीस विरोधकांना न मिळालेली उमेदवारी आणि जाहीर झालेल्या नावांमध्ये फडणवीस यांच्या निकटवर्तीयांचा असलेला समावेश यामुळे उमेदवारी वाटपात फडणवीसांचा शब्द चालला असे म्हटले जाते. बावनकुळे यांच्याबाबत वरून नकार असल्याने फडणवीस यांनी दटके यांचे नाव सुचवले अशीही माहिती आहे. दटके हे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी व फडणवीस या दोघांचेही निकटवर्ती आहेत.