देवेंद्र फडणवीसांवर नवाब मलिकांचा गंभीर आरोप, पंकजा मुंडे म्हणाल्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2021 12:54 PM2021-11-01T12:54:42+5:302021-11-01T12:54:52+5:30
'नवाब मलिकांनी लवंगी लावली, दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडणार.'
मुंबई: ड्रग्स प्रकरणावरुन नवाब मलिक यांनी आज थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. ड्रग्स पेडलर जयदीप राणा याचे देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंध असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला. मलिकांनी आज सकाळी अमृता फडणवीस आणि त्यानंतर देवेंद्र यांचा एका व्यक्तीसोबतचा फोटो शेअर केला आणि पत्रकार परिषदेत फडणवीसांचे ड्रग पेडलरसोबत संबंध असल्याचा आरोप केला. या आरोपांवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस यांचे ड्रग्स पेडलर जयदीप राणा यांच्याशी घनिष्ठ संबंध आहेत आणि फडणवीसांच्या इशाऱ्यावरुनच राज्यात ड्रग्सचा खेळ सुरु असल्याचा गंभीर आरोप फडणवीसांवर करण्यात आलाय. मलिकांच्या या आरोपांवर आता भाजप नेते आक्रमक झालेत. भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी नवाब मलिकांचा हा आरोप अत्यंत हास्यास्पद असल्याचं म्हटलं. 'ज्या मुख्यमंत्र्यांनी राज्यात एवढं चांगलं काम केलं, त्या मुख्यमंत्र्यांवर अशा प्रकारचा आरोप केला जातोय. हा आरोप अत्यंत हास्यास्पद आहे', असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
'दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार...'
नवाब मलिक यांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर देवेंद्र फडणवीस यांनी या आरोपांना तातडीने पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले आहे. त्यात देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नवाब मलिक सध्या कोणत्या मानसिकतेमध्ये आहेत, हे सर्वांना माहिती आहे. नवाब मलिक यांनी लंवगी फटाकडी लावण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र मी दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार आहे. ज्यांचे संबंध अंडरवर्ल्डशी आहेत अशा लोकांनी माझ्याबाबत आणि ड्रग्सबाबतही बोलू नये. नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी असलेले कनेक्शन उघड करणार असून, याचे पुरावे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनाही देणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
'हे फक्त ठाकरे-पवारच करू शकतात'
फडणवीसांवर केलेल्या आरोपानंतर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर जोरदार टीका केली आहे. 'एवढ्या खालच्या पातळीवरचे आरोप करण्याची नवाब मलिकांची कॅपेसिटी नाही, हे केवळ ठाकरे-पवारच करू शकतात, असं सोमय्या म्हणाले. तसेच, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एक हजार कोटींपेक्षा अधिक रक्कम नातेवाईकांच्या खात्यात वर्ग केली आहे. ईडी आणि आयकर विभागाच्या धाडीतून हे सिद्धही झालंय. पण, त्यावरून लक्ष विचलीत करण्यासाठीच समीर वानखेडे आणि अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.