पंकजा मुंडेंचा मोठा निर्णय; राजकारणापासून २ महिने अलिप्त राहणार, कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2023 01:07 PM2023-07-07T13:07:54+5:302023-07-07T13:08:19+5:30
राजकारण मी करेन नाही करेन, माझ्या नैतिकतेवर वारंवार प्रश्न उभे केले जात आहेत. मी जे काही करेन डंके की चोट पर सर्व करेन असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं.
मुंबई – मी २० वर्षात कधीही सुट्टी घेतली नाही. मला आता त्याची गरज आहे. मला अंर्तमुख होण्याची गरज आहे. मी आमदार झाल्यावर माझ्या मुलाखतीत म्हटलं होतं की, राजकारणात ज्या विचारधारेला डोळ्यासमोर मी पुढे आली. त्या विचारधारेशी मला कधी प्रतारणा करावी लागेल किंवा चुकीच्या तडजोडी कराव्या लागतील तेव्हा मी राजकारणातून एक्झिट घ्यायला मागे पुढे पाहणार नाही. आत्ताच्या परिस्थितीत मला एका ब्रेकची आवश्यकता आहे. तो मी घेणार आहे. मी राजकारणापासून २ महिने सुट्टी घेऊन अंर्तमुख होऊन सगळ्या गोष्टींचा विचार करणार आहे अशी माहिती भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी दिली आहे.
पंकजा मुंडे म्हणाल्या की, राजकारणात सध्या वेगवेगळे प्रयोग पाहायला मिळतायेत. बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही. शरद पवारांची राष्ट्रवादी राहिली नाही. मात्र पंडित दिनदयाळ उपाध्याय आणि अटलबिहारी वाजपेयींची भाजपा सदैव राहावी यासाठी माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता धडपडतेय. मी नक्षलग्रस्त भागात जाऊन, अन्नपाण्याची अपेक्षा न करता पक्षासाठी काम करतेय. असं असताना माझ्या नैतिकतेवर आणि विश्वासर्हतेवर शंका निर्माण होणे याने मला दु:ख वाटते असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत राजकारण मी करेन नाही करेन, माझ्या नैतिकतेवर वारंवार प्रश्न उभे केले जात आहेत. मी जे काही करेन डंके की चोट पर सर्व करेन. हजारो, लाखो लोक मला काय करताय असा प्रश्न करतायेत. पक्षाचा आदेश मी कायमच मानत आलीय. १०६ आमदारांच्या मनात अनेक गोष्टी आहेत. कुणी समोर येऊन बोलू शकत नाही. मी फक्त मुद्द्यांवर बोलले. कधीही नाराजी व्यक्त केली नाही. अप्रामाणिकपणा माझ्या स्वभावात नाही. माझ्यावर आरोप झाले. पण सर्वांना उत्तरे दिली. मी ईश्वर साक्ष कथन करते, मी कोणत्याही पक्षाच्या, नेत्याच्या पक्षप्रवेशासाठी कधीही भेटले नाही. मी राहुल गांधींना कधी भेटले नाही. माझे जे काही जगासमोर आहे. पारदर्शकता आणि प्रामाणिकपणाला खूप महत्व आहे. मी नाराज नाही पण दुखी आहे. माझ्या नैतिकतेवर वारंवार प्रश्न उपस्थित होत आहेत त्यामुळे मी न्यायालयात लढाई लढणार आहे असं पंकजा मुंडेंनी स्पष्ट केले.
काँग्रेसमध्ये जाण्याची बातमी चुकीची
२०१९ च्या निवडणुकीनंतर अनेक घटना घडल्या. मी पक्षातून बाहेर जाणार अशा चर्चा सुरू होत्या. मी वेळोवेळी स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्यामुळे सातत्याने माझ्याबद्दल चर्चा करणे म्हणजे माझ्या नैतिकतेवर प्रश्न निर्माण करणारे आहे. मी कुठल्याही पक्षात जाणार नाही. पुन्हा पुन्हा भूमिका स्पष्ट करणार नाही. मी राहुल गांधी, सोनिया गांधी यांची भेट घेतल्याची बातमी छापली. बातमीसमोर प्रश्नचिन्ह लावून माझ्या विश्वासर्हतेवर बोलले जाते. या चॅनेलवर मी मानहानीचा दावा ठोकणार आहे. माझे करिअर कवडीमोलाचे नाही. २० वर्ष मी राजकारणात काम करतेय. माझा लोकांशी थेट संपर्क आहे. पाठित खंजीर खुपसण्याचे रक्त माझ्या अंगात नाही. माझ्यावर वडिलांचे संस्कार झाले आहे. विधान परिषद, राज्यसभा निवडणुका आल्यात त्यात प्रत्येकवेळी पंकजा मुंडे यांचे नाव चर्चेत येते. जेव्हा जेव्हा माझे नाव चर्चेत आले. तेव्हा मला संधी का दिली नाही हे पक्षाने सांगावे. मी कधीही पक्षाविरोधात भाष्य केले नाही. मला संधी का मिळाली नाही याचे उत्तर माझ्याकडे नाही असंही पंकजा मुंडे यांनी सांगितले.