"शिवसेनेचे तुकडे होत आहेत, याकडे राऊतांनी बघावे, मुंबईची काळजी करु नये"
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2022 06:08 PM2022-07-09T18:08:02+5:302022-07-09T18:09:07+5:30
Pravin Darekar : मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची शिवसेनेशी भाजपने युती केल्याचा आरोप संजय राऊतांनी केला होता. यावर भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी टीका केली आहे.
मुंबई : शिवसेनेतील ४० आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड करत शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. त्यानंतर या बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या पाठिंब्याने मुख्यमंत्रिपद मिळवले आहे. या सर्व घटनाक्रमामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदारांविरोधात कमालीचे आक्रमक झाले आहेत. शिवसेना नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते, खासदार संजय राऊत हे पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचे मेळावे घेत आहेत.
संजय राऊत हे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांवर टीका केली आहे. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची शिवसेनेशी भाजपने युती केल्याचा आरोप संजय राऊतांनी केला होता. यावर भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी टीका केली आहे. "शिवसेना मुळापासून संपविण्यासाठी संजय राऊत अशा प्रकारची व्यक्तव्य करीत आहेत. त्यामुळे शिवसेनेचे नुकसान होत आहे. शिवसेनेचे तुकडे होत आहे, याकडे राऊतांनी बघावे, मुंबईची काळजी करु नये, मुंबईला कुणी हिरावून घेणार नाही, असे प्रवीण दरेकर म्हणाले.
याचबरोबर, संजय राऊतांच्या आरोपांना गंभीर घेण्याची गरज नाही. संजय राऊतांचे विधानाला शून्य किंमत आहे. भाजप हा खूप मोठा पक्ष आहे. भाजपचा हात पकडून शिवसेना मोठी झाली आहे. बाळासाहेबांच्या मुशीत तयार झालेले मुख्यमंत्री झाले आहेत, तसेच जे आमदार शिंदे गटात आले आहेत ते देखील बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीत तयार झाले आहेत. त्यामुळे बाळासाहेबांना नक्कीच समाधान लाभेल, असे प्रवीण दरेकर यांनी सांगितले.
दरम्यान, शिवसेनेचा मुख्यमंत्री दिल्लीत जात नाही, एकनाथ शिंदे हे भाजपचे मुख्यमंत्री आहेत, त्यांचे हायकमांड दिल्लीत आहे, अशी टीका संजय राऊत यांनी नाशिकमध्ये केली. तसेच, आम्ही लाल किल्ल्याला सलाम नाही मारत आम्ही रायगडाला सलाम करतो. आमचे हायकमंड दिल्ली नाही मातोश्री आहे. दिल्लीवाल्यांना मुंबई तोडायची आहे, म्हणून शिवसेना तोडली. यांना महाराष्ट्रचे तीन तुकडे करायचे आहेत, असा दावाही संजय राऊत यांनी केला.