बरबटलेल्या हातांनी काय चौकशी करणार; मुबै बँक चौकशी प्रकरणी दरेकरांची संतप्त प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 02:04 PM2021-09-23T14:04:19+5:302021-09-23T14:06:36+5:30
Mumbai Bank pravin darekar : मुंबै बँक घोटाळा प्रकरणाच्या चौकशीचे सहकार विभागाचे आदेश. प्रविण दरेकर यांनी स्पष्ट केली भूमिका.
गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईबँक कथित अनियमिततेची चर्चा सुरू आहे. दरम्यान, याची चौकशी करण्याचे आदेश सहकार विभागाकडून देण्यात आले आहेत. याचा अहवाल येत्या ३ महिन्यांमध्ये सादर करावा लागणार असून यासाठी जिल्हा उपनिबंधक प्रताप पाटील यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या प्रकरणी विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी राज्य सरकारच्या या निर्णयावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत टीकाही केली आहे. यावेळी त्यांनी बरबटलेल्या हातांनी चौकशी करणार का? असा संतप्त सवालही केला.
"मी सरकारवर निरनिराळ्या मुद्द्यांवरून टीका करत असल्यानं मला कोणत्याही चौकशीत अडकवता येतं का त्याचा हा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. कायद्यानुसार टेस्ट ऑडिट झाल्यानंतर कॉम्पलायन्स रिपोर्ट देण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी असतो. परंतु सरकारला इतकी घाई झालीये की त्यापूर्वीच त्यांनी चौकशी प्रक्रिया सुरू केली," असं दरेकर यांनी नमूद केलं.
"बरबटलेल्या हातांनी चौकशी काय करणार? असा सवाल करत त्यांनी राज्य सहकारी बँकेची अर्धवट चौकशी पुन्हा सुरू करा," असं म्हटलं. "मी एक पत्र देणार आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत महाघोटाळा आहे. १५-२० कोटी रूपयांचं सॉफ्टवेअर १५० कोटी रूपयांना घेतलं आहे. राज्यातल्या राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखालील अन्य जिल्हा बँका आणि सहकारी संस्थांची आम्ही रितसर तक्रार करणार आहोत, महाराष्ट्रातील घोटाळ्यांच्या महामेरूंना उघडं करणार. प्रविण दरेकरांचा एककलमी कार्यक्रम आता सहकारातले घोटाळे बाहेर काढणं हा आहे," असंही त्यांनी सांगितलं.
सर्व आरोपांची उत्तरं देणार
सर्व आरोपांची उत्तरं जिल्हा बँक देणार आहे. यापूर्वीही उत्तरं दिली आहे. अशाप्रकारे सूडानं वागलं तरी आवाज दाबता येणार नाही. अशा चौकशांना आपण भीक घालणार नाही. गेल्या काही वर्षांमध्ये सर्वांना सोबत घेऊन काम केलं असून १० वर्ष बँकेला अ वर्ग मिळाला असल्याचंही दरेकरांनी नमूद केलं.