कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा?; कोरोनावरुन प्रवीण दरेकरांचा खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 05:35 PM2021-04-01T17:35:24+5:302021-04-01T17:39:20+5:30
pravin darekar react on corona situation: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरले आहे, अशी टीका दरेकरांनी केलीय.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. राज्यातील अनेक ठिकाणी पुन्हा एकदा लॉकडाऊनची स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरले आहे. याला सर्वस्वी मुख्यमंत्री आणि राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. (pravin darekar react on corona situation in maharashtra state)
राज्याच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले असताना पुन्हा लॉकडाऊन करून सर्वसामान्य लोकांचे हाल होण्याची सरकार वाट पाहत आहे का? अशी विचारणा प्रवीण दरेकर यांनी केली. राज्यातील एकूण राजकीय तसेच कोरोना परिस्थितीसंदर्भात प्रवीण दरेकर यांनी रोखठोक भाष्य केले. भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दरेकर बोलत होते.
पाच हजार रुपये जमा करा, मगच टाळेबंदी लावा
सरकारला लॉकडाऊन लावायचाच असेल, तर आधी सर्व क्षेत्रातील कष्टकऱ्यांच्या खात्यात, परीक्षा देणारे तरुण, छोटा व्यावसायिक, कष्टकरी, संघटित व असंघटित कामगारांच्या खात्यात ५ हजार रुपये जमा करावे आणि मगच टाळेबंदी जाहीर करावी, अशी मागणी दरेकर यांनी यावेळी केली. सर्वसामान्य जनता वाऱ्यावर पडल्याचे पाहायला मिळत आहे. देशाच्या तुलनेत राज्याचा ढिसाळ कारभार सुरू आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरले आहे, अशी टीका दरेकरांनी केली आहे.
“व्याजदर कपातीबाबत सकाळी पेपर वाचल्यावर निर्मला सीतारामन यांना समजले असावे”
सरकार आणि प्रशासन झोपेतून जागे होत नाही
नाशिकमध्ये रुग्णालयात बेड न मिळाल्यामुळे ऑक्सिजन सिलेंडरसह आंदोलन करणाऱ्या कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध आणि खुद्द सरकारविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जावा, अशी मागणी करत नाशिकच्या दौऱ्यात आयुक्तांची भेट घेऊन बेडस, व्हेंटीलेटर उपलब्ध नाहीत, हे लक्षात आणून दिलं होतं. दौऱ्यावरून परत आल्यानंतर मुख्यमंत्र्यानाही कल्पना दिली होती. पण हे सरकार आणि प्रशासन झोपेतून जागे होत नाही, या शब्दांत दरेकर यांनी हल्लाबोल केला.
प्रगती का हायवे! महाराष्ट्रातील रस्ते बांधणासाठी २,७८० कोटी; नितीन गडकरींची घोषणा
आता केंद्राने हस्तक्षेप करावा
केंद्र सरकारने कोरोना काळात अनेक उपाययोजना केल्या, सर्वसामान्यांना मदत केली. त्यामुळेच देश पातळीवर केंद्र सरकार कोरोना रोखण्यात यशस्वी ठरल्याचा दावा करत केंद्राने राज्याला दिलेल्या व्हेंटिलेटरपैकी ४०० व्हेंटिलेटर प्रशिक्षित तंत्रज्ञ नाहीत, म्हणून धूळ खात पडून आहेत. केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाला, गृह विभागाला आमची विनंती आहे की, त्यांनी राज्यात लक्ष घालावे आणि कोरोना रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी दरेकरांनी केली.