"...म्हणून सत्ताधारी मंडळी वारंवार सरकार पाडून दाखवा म्हणताहेत"
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2020 04:53 PM2020-07-26T16:53:31+5:302020-07-26T17:02:39+5:30
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावरून विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा हल्लाबोल
पिंपरी: राज्य सरकार पाडण्याबाबत भाजपकडून कोणतीही हालचाल सुरू नाही. हा संकटाचा काळ आहे. त्यामुळे आम्ही कोविडवर फोकस केला आहे, अशी माहिती विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली. कोविडचे मोठे संकट राज्यावर आहे. आरोग्य व्यवस्थेची दुरवस्था झाली आहे. त्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी सरकार पाडून दाखवा, अशी वक्तव्य सत्ताधाऱ्यांकडून केली जात आहेत, असेही ते म्हणाले.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय येथे पत्रकारांशी बोलताना प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर टिका केली. दरेकर म्हणाले, कोरोना रोखण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. कोविडचा काळ असल्याने कोणीही राजकारण करणे उचित नाही. राज्यातील विरोधी पक्ष म्हणून आम्ही याचे राजकारण करत नाही. देवेंद्र फडणवीस गेल्या आठवड्यात दिल्लीला गेले होते. त्यावेळी त्यांनी स्वत: सांगितले की, मी दिल्लीला कशासाठी आलोय याबाबत कोणाच्या मनात संभ्रम नको. कोविडचे संकट आमच्या समोर महत्त्वाचे आहे. आज कोरोनामुळे लोक भयभीत आहेत. त्यांना उपचारांची आवश्यकता आहे. त्यामुळे राज्य सरकार पाडणे हा आमच्यासाठी प्राधान्याचा विषय होऊ शकत नाही, हे आम्ही पुन्हा-पुन्हा सांगितले. मात्र कोविडमधील अपयश व आरोग्य व्यवस्थेची झालेली दुरवस्था यापासून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी आमचे सरकार पाडणार, आमचे सरकार पाडणार, असे मुद्दाम सांगितले जात आहे. सरकार पाडणे आमच्या ध्यानीमनीदेखील नाही. हिंदूहृदय सम्राट व हिंदुत्व ही शिवसैनिकांची विचारधारा आहे. मात्र सत्तेत गेल्यानंतर त्यांच्याकडून राममंदिराचे भूमिपूजन ऑनलाइन करा, असे सांगणे हे दुर्दैवी आहे, अशा शब्दांत दरेकरांनी सरकारवर हल्ला चढवला.