"वर्तमान कष्टाळू मुख्यमंत्री अन् माजी कष्ट टाळू मुख्यमंत्री!" राम कदमांची विधानसभेत तुफान फटकेबाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 08:42 PM2023-07-24T20:42:42+5:302023-07-24T20:46:12+5:30
यावेळी त्यांनी निधी वाटपावरही भाष्य केले. ते बोलत असताना सभागृहात विरोधकांनी आक्षेपही घेतला होता. पण...
विधानसभेत आज पुरवणी मागण्यांसंदर्भात चर्चा सुरू असताना सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी बघायला मिळाली. यावेळी भाजप नेते तथा आमदार राम कदम यांनी "वर्तमान कष्टाळू मुख्यमंत्री अन् माजी कष्ट टाळू मुख्यमंत्री," असा उल्लेख करत शेवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवत तुफान फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी निधी वाटपावरही भाष्य केले. ते बोलत असताना सभागृहात विरोधकांनी आक्षेपही घेतला होता.
निधी वाटपासंदर्भात बोलताना राम कदम म्हणाले, २०१९ ते अडीच वर्षाच्या कालखंडात महाराष्ट्रानं असा मुख्यमंत्री पाहिला जो घराच्या बाहेर कधी पडला नाही. असं सरकार पाहिलं ज्या सरकारने बाकीच्या सगळ्या सदस्यांना कुठलाही निधी दिला नाही. त्यावेळी तुम्हाला नाही आठवलं. त्यावेळी तुम्ही आज जे बोलत होतात ती विधानं तुम्हाला त्यावेळी का आठवली नाही? असा सवाल राम कदम यांनी यावेळी आक्षेप घेणाऱ्या विरोधी पक्षातील आमदारांना केला.
कष्टाळू मुख्यमंत्री, कष्ट टाळू मुख्यमंत्री! -
राम कदम म्हणाले, "विरोधी पक्षातील सदस्य मी बाब क्रमांक सांगिली न सांगितली, यासाठी उभे नाही राहीले, ते सर्व रेकर्डवर आहे. त्यांना झोंबलं, एकाच गोष्टीचं 'वर्तमान कष्टाळू मुख्यमंत्री आणि माजी कष्ट टाळू मुख्यमंत्री'. या वाक्याचं त्यांना झोंबलंय. एवढेच नाही, तर ज्या वेळी इर्शाळाच्या वेळी मुख्यमंत्री दोन तास वर चढून गेले. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 20-20 तास काम करतात. हे तुम्ही नाकारणार आहात? काय नाकारणार आहात तुम्ही?" असा सवालही कदम यांनी यावेळी विरोधकांना केला.
सुर्याला कितीही झाकण्याचा प्रयत्न केला, तरी सूर्य सूर्यच -
यावेळी, "वडेट्टीवार साहेब, सुर्याला कितीही झाकण्याचा प्रयत्न केला, तरी सूर्य सूर्यच आहे. त्यामुळे तुम्हालाही हे मान्य करावं लागेल. या सरकारमध्ये मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हे १८-१८-२०-२० तास काम करणारे आहेत," असेही राम कदम म्हणाले.