संजय राऊत, त्रागा करू नका; सोमय्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्या, राम कदम यांचं खुलं आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2020 11:36 AM2020-11-13T11:36:28+5:302020-11-13T11:44:32+5:30
राम कदम यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना हे आव्हान दिले आहे. तसेच संजय राऊतांबद्दल मला व्यक्तीशः अत्यंत आदर आहे. मात्र, त्यांनी माध्यमांशी बोलताना सोमय्यांच्या एका तरी आरोपाचे उत्तर दिले का?, असा सवाल कदम यांनी केला आहे. (ram kadam, sanjay raut)
मुंबई - भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या आरोपामुळे संजय राऊत चांगलेच संतापले आहेत. त्यांनी माध्यमांशी संवाद साधत, किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला चढवला. यानंतर आता भाजप नेते राम कदम यांनी, या वादात उडी घेतली आहे. किरीट सोमय्या यांनी दस्तऐवज दाखवत आरोप केला आहे. यामुळे, शिवसेना नेते संजय राऊतांनी त्रागा करू नये. तसेच थातूरमातूर बोलून विषय टोलवू नका. सोमय्यांच्या आरोपांना उत्तरं द्या, असे आव्हान राम कदम यांनी राऊतांना दिले आहे.
राम कदम यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना हे आव्हान दिले आहे. तसेच संजय राऊतांबद्दल मला व्यक्तीशः अत्यंत आदर आहे. मात्र, त्यांनी माध्यमांशी बोलताना सोमय्यांच्या एका तरी आरोपाचे उत्तर दिले का?, असा सवालही कदम यांनी केला आहे.
कदम म्हणले, संजय राऊत त्रागा का करून घेत आहेत माहीत नाही. सोमय्या यांनी कागदपत्रांच्या आधारे आरोप केला आहे. राऊतांनी सोमय्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला हवीत. थातूरमातूर उत्तरं देऊ नयेत. एवढेच नाही, तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर आरोप करण्यात आले आहेत. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत. ते मुख्यमंत्री नसते, तर कुणी हा प्रश्नही उपस्थित केला नसता. यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जमिनीचे 21 व्यवहार केलेत की नाही? हे राऊतांनी सांगावे, असे कदम यांनी म्हटले आहे.
काय आहे किरीट सोमय्यांचा आरोप -
वास्तुविशारद अन्वय नाईक आणि त्यांचे कुटुंबीय अक्षता, आज्ञा आणि रश्मी उद्धव ठाकरे, मनीषा रवींद्र वायकर यांच्यात अनेक जमीन व्यवहार झाल्याचा आरोप भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा केला. ठाकरे कुटुंबाची जमिनीत एवढी गुंतवणूक का आणि कशासाठी? त्यांचा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे का? मुख्यमंत्री याची माहिती राज्यातल्या जनतेला देणार का? नाईक-ठाकरे-वायकर कुटुंबाचे नेमके संबंध काय? वायकर आणि ठाकरे कुटुंब कशासाठी एकत्र आले? जमीन खरेदी व्यवहारात अनेकदा ब्लॅक-व्हाईट असते. लोकांना तसे वाटते. त्यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राला जमीन खरेदी व्यवहाराची माहिती द्यावी, उद्धव ठाकरेंचा जमीन खरेदीचा व्यवसाय आहे का? तसे असेल तर त्यांनी जनतेला सांगावे, असे आवाहन सोमय्या यांनी केले होते.
काय म्हणाले संजय राऊत -
माध्यमांशी संवाद साधतांना संजय राऊत म्हणाले, अन्वय नाईक यांच्या आत्महत्येचं प्रकरण हे वेगळं आहे, आमच्या मराठी भगिनीचं कुंकू पुसलं गेलं, अनेक महिन्यापासून न्यायाची मागणी करतायेत, त्यावर शेठजींच्या पक्षाचे व्यापारी प्रवक्ते काहीही बोलायला तयार नाहीत, २०१४ सालचे हे जमिनीचे कायदेशीर व्यवहार आहेत, २१ व्यवहार केलेत हे दाखवावेत, हा खोटारडेपणाचा कळस आहे, मराठी माणसांनी व्यवहार केले ते डोळ्यात खुपतंय का? किरीट सोमय्यांनी कितीही फडफड केली त्यातून काही निष्पन्न होणार नाही. तर महाराष्ट्र सरकार ५ वर्ष चालणार आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच अन्वय नाईक यांच्या पत्नीला न्याय देण्याची भूमिका शिवसेनेची आहे. ज्यांच्यामुळे ही आत्महत्या झाली त्यांच्या गुन्हेगारांना कायद्याच्या चौकटीत शिक्षा देण्याची आहे, गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न शेठजींच्या पक्षाकडून होत आहे. सोमय्या गिधाडासारखे कागद फडकवतायेत..कायद्याच्या चौकटीत राहून केलेले व्यवहार आहेत. रोज सकाळी आरशात पाहून भ्रष्टाचार भ्रष्टाचार किंचाळत असतील, नैराश्य आणि वैफल्यग्रस्त आहेत. तपासाची दिशा बदलून टाकण्यासाठी शेठजींच्या पक्षाचे प्रवक्ते फालतू मुद्दे घेऊन समोर येत आहेत. सोमय्यांना काहीही माहिती नाही, फालतू माणूस आहे अशा शब्दात संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया मांडली.