Maharashtra Politics: “ठाकरे सरकार आणि वेदांता-फॉक्सकॉनमधील वाटाघाटींचा तपशील उघड करा”; भाजपची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 11:37 PM2022-09-14T23:37:29+5:302022-09-14T23:38:13+5:30

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला जाण्यास उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारचे वसुली धोरणच कारणीभूत असल्याची टीका भाजप नेत्याने केली आहे.

bjp leader ram shinde slams former maha vikas aghadi uddhav thackeray govt for vedanta foxconn project gone to gujarat | Maharashtra Politics: “ठाकरे सरकार आणि वेदांता-फॉक्सकॉनमधील वाटाघाटींचा तपशील उघड करा”; भाजपची मागणी

Maharashtra Politics: “ठाकरे सरकार आणि वेदांता-फॉक्सकॉनमधील वाटाघाटींचा तपशील उघड करा”; भाजपची मागणी

Next

Maharashtra Politics: महाराष्ट्रात येणारा वेदांता आणि फॉक्सकॉन यांचा प्रकल्प गुजरातला गेल्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीचे नेते नव्या शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार घणाघात करत असून, शिंदे गट आणि भाजपकडून पलटवार करण्यात येत आहे. यातच आता तत्कालीन महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि वेदांता-फॉक्सकॉनमधील वाटाघाटींचा तपशील उघड करावा, अशी मागणी भाजप नेत्याकडून करण्यात आली आहे. 

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी मंत्री प्राध्यापक राम शिंदे यांनी मागील ठाकरे सरकारवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. हा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्यास उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारचे वसुली धोरणच कारणीभूत आहे. अडीच वर्षांच्या काळात ठाकरे सरकारने केवळ वाट्याचाच विचार केल्याने घाटा सोसण्यास तयार नसलेल्या कंपन्यांवर महाराष्ट्रातून गाशा गुंडाळण्याची वेळ आली, असा आरोप शिंदे यांनी केला आहे. 

नितीन गडकरींनी उद्धव ठाकरेंकडे तक्रारही केली होती

आघाडी सरकारमधील पक्षांचे कार्यकर्ते खंडणी वसुली करत असल्याची तक्रार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती, असे दावा शिंदे यांनी केला आहे. तसेच देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात गुंतवणुकीसाठी अव्वल असलेल्या महाराष्ट्रातून गाशा गुंडाळायला महाविकास आघाडी सरकारने भाग पाडल्याने गुंतवणुकीला मोठा फटका बसला आहे. पुन्हा महाराष्ट्राचे अव्वल स्थान मागे पडले आहे आणि महाराष्ट्राची जागा कर्नाटकने घेतली, या शब्दांत राम शिंदे यांनी मविआ सरकारच्या कामगिरीवर निशाणा साधला. 

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या वसुली धोरणाचा महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्राने धसका घेतला. सरकारमधील तीन पक्षांचे समाधान करणे परवडत नसल्यामुळेच वेदांता-फॉक्सकॉनने प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेतला असावा. गेल्या अडीच वर्षांतील धोरण लकवा आणि वसुलीच्या तगाद्याला कंटाळून अनेक गुंतवणुकदारांनी महाराष्ट्राकडे पाठ फिरविली आहे, असा मोठा आरोपही शिंदे यांनी केला आहे.

Web Title: bjp leader ram shinde slams former maha vikas aghadi uddhav thackeray govt for vedanta foxconn project gone to gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.