अखेर रणजीतसिंह मोहिते पाटलांचं ठरलं! आमदारकीचा राजीनामा; लवकरच पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 06:46 PM2024-10-19T18:46:48+5:302024-10-19T19:08:33+5:30
रणजीतसिंह मोहिते पाटील हे माढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.
Ranjeetsing Mohite Patil ( Marathi News ) : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वाटेवर असलेले भाजपचे विधानपरिषद आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती आहे. रणजीतसिंह मोहिते पाटील हे माढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असून त्यामुळेच त्यांनी विधानपरिषद आमदारकीचा राजीनामा दिल्याचे समजते. मात्र आमदारकीच्या राजीनाम्याबद्दल स्वत: रणजीतसिंह मोहिते पाटलांनी अद्याप अधिकृतरित्या माहिती दिलेली नाही.
लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील कुटुंबाने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची साथ देण्याचा निर्णय घेतला होता. ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढ्यातून लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकलीही. मात्र विजयसिंह मोहितेंचे पुत्र रणजीतसिंह मोहिते हे अद्यापही भाजपमध्येच होते. असं असलं तरी लोकसभा निवडणुकीपासून ते भाजपच्या व्यासपीठावर जाणं टाळत होते. त्यामुळे ते लवकरच भाजपला रामराम करतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. अखेर आता त्यांनी आपला राजकीय निर्णय घेत आमदारकीचा राजीनामा दिल्याची माहिती आहे.
माढा विधानसभेत तिकिटाचा तिढा
माढा विधानसभा मतदारसंघातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून लढण्यासाठी तब्बल सहा नेते इच्छुक असल्याचे समजते. यामध्ये विद्यमान आमदार बबन शिंदे यांचे पुत्र रणजीत शिंदे, रणजीतसिंह मोहिते पाटील, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील, संजय कोकाटे, नितीन कापसे, संजय घाटनेकर पाटील यांचा समावेश आहे. यातील अभिजीत पाटील, संजय कोकाटे, नितीन कापसे, संजय घाटनेकर पाटील अशा चौघांनी आज शरद पवारांची भेट घेतली. "आम्ही सर्व इच्छुक भेटल्यानंतर रणजीत शिंदे यांना आपण उमेदवारी देणार नसल्याचं शरद पवारांनी आम्हाला आश्वास्त केलं आहे," अशी माहिती या इच्छुकांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.