Raosaheb Danve : आता हे काय काढतात? आम्हीच यांचे कोथळे काढू; रावसाहेब दानवेंचा शिवसेनेवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2022 10:57 AM2022-05-09T10:57:08+5:302022-05-09T12:30:23+5:30
"यांचे लग्न ठरले होते आमच्याशी, हे पळून गेले आणि दुसऱ्याशीच लग्न केले. यांचे सर्व आमदार आणि खासदार एका मुख्यमंत्री पदासाठी नाराज आहेत..."
सध्या राज्यात भाजप आणि शिवसेनेचे नेते सातत्याने एकमेकांविरोधात टोलेबाजी करताना दिसत आहेत. यातच, आज भाजप नेते, तथा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या एका विधानावरून पलटवार करताना, शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. यांचे लग्न ठरले होते आमच्याशी, हे पळून गेले आणि दुसऱ्याशीच लग्न केले. यांचे सर्व आमदार आणि खासदार एका मुख्यमंत्री पदासाठी नाराज आहेत. आता हे काय कोथळे काढतात? निवडणुकीत आम्हीच यांचे कोथळे काढू, असे दानवे यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले दानवे? -
दानवे म्हणाले, "यांचं लग्न ठरलं होतं आमच्यासोबत हे पळून गेले आणि दुसऱ्याशीच लावलं. तुम्हीही मतं दिलीच असतील ना? तुम्ही भाजप-सेनेला मतदान दिलं. ज्याला मतं दिली त्याच्याबरोबर युती तोडून टाकली आणि स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी काय? आज यांचे सर्व आमदार आणि खासदार नाराज आहेत एका मुख्यमंत्रीपदासाठी. यामुळे जनता निर्णय करेल. आता हे काय कोथळे काढतात? निवडणुकीत आम्ही कोथळे काढू यांचे."
काय म्हणाले होते संजय राऊत -
"लोक म्हणतात, की प्रेमात आणि युद्धात सर्व क्षम्य असते. पण नाही, प्रेमात नैतिकता पाळायला पाहिजे. पण जेव्हा कुणी युद्ध करायला येत असेल, तेव्हा मी या मताचा आहे, की मी नैतिकता पाळणारा आहे. जर तुम्ही नैतिकता पाळणार नसाल, तुम्ही युद्धाचे नियम पाळणार नसाल, तुम्ही पाठिमागून वार करणार असाल, तर मलाही कोथळा काढण्याचा अधिकार आहे," असे संजय राऊत यांनी म्हटले होते. ते मुंबई येथे आयोजित शिवसैनिकांच्या सोशल मीडिया सेलच्या मेळाव्यात बोलत होते.