शरद पवारांनी ‘ज्योतिषी’ म्हणून उडवली होती खिल्ली, आता रावसाहेब दानवेंनी दिलं असं उत्तर; म्हणाले…
By श्रीकृष्ण अंकुश | Published: November 25, 2020 01:44 PM2020-11-25T13:44:45+5:302020-11-25T13:53:33+5:30
“दोन महिन्यात सरकार येईल. पण, सरकार कसं येईल? यासंदर्भातील नियोजन तुम्हाला कसं सांगू?” असं दानवे यांनी म्हटलं आहे.
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजप नेते रावसाहेब दानवे यांची 'ज्योतिषी' म्हणून खिल्ली उडवली होती. यावर दानवे यांनी आता प्रत्युत्तर दिले आहे. रावसाहेब दानवे यांनी एका एका कार्यक्रमात बोलताना राज्यात येत्या दोन महिन्यांत भाजप सरकार सत्तेवर येईल, असा दावा केला होता. यासंदर्भात पवारांना विचारले असता, "त्यांनी सांगितले आहे तर तसे होईल. ज्योतिष शास्त्रातील जाणकार म्हणून त्यांचा परिचय करून दिलाय परंतु सामान्य माणूस सोबत असल्यावर कुरधुड्या ज्योतिषाचे काही चालत नाही, असा टोला पवारांनी लगावला होता. त्यावर आता दानवे यांनी उत्तर दिले आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
यासंदर्भात बोलताना दानवे म्हणाले, “माझ्यावर टीका करण्याचा शरद पवारांना आधिकार आहे. ते या महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत. मी त्यांच्यावर टीका करणार नाही. मात्र, एक गोष्ट मला समजते, की या राज्यातील कारभारावर जनता नाराज आहे. हा माझ्या भविष्याचा प्रश्न नाही.”
यावेळी दानवे यांना पुन्हा एकदा राज्यात भाजपाचे सरकार येणार असल्याच्या दाव्यासंदर्भात विचारले असता, “दोन महिन्यात सरकार येईल. पण, सरकार कसे येईल? यासंदर्भातील नियोजन तुम्हाला कसे सांगू?” असे दानवे म्हणाले.
काय म्हणाले होते शरद पवार? -
रावसाहेब दानवे हे अनेक वर्षे विधीमंडळात व संसदेत काम करत आहेत. पण ठीक आहे मला त्यांचा हा गुण माहित नव्हता. साधारणतः खेड्यापाड्यात शेतकर्यांमध्ये काम करणारा सहकारी म्हणून त्यांच्याकडे पहात होतो. पण उद्याचे चित्र सांगण्याचा अभ्यास आणि तयारी मला माहिती नव्हती. त्यामुळे त्यांनी सांगितले आहे, तर तसे होईल. ज्योतिष शास्त्रातील जाणकार म्हणून त्यांचा परिचय करून दिलाय परंतु सामान्य माणूस सोबत असल्यावर कुरधुड्या ज्योतिषाचे काही चालत नाही, असे पवार म्हणाले होते.
काय म्हमाले होते रावसाहेब दानवे -
राज्य सरकारमध्ये वेगवेगळ्या पक्षातील वेगळ्या विचारांचे नेते सहभागी असल्याने त्यांच्यामध्ये तीव्र मतभेद आहेत. कोणाचा कोणाला पायपूस नाही. त्यामुळे येत्या दोन महिन्यांत राज्यात भाजपाचे सरकार सत्तेत येईल, असे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटले होते.