उद्धव ठाकरेंचं भाषण करमणूक करणारं, धोरणात्मक नाही; रावसाहेब दानवेंनी उडवली खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 01:38 PM2024-06-20T13:38:35+5:302024-06-20T13:42:59+5:30

पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी भाजपा नेत्यांवर सडकून टीका केली, त्यावर आता भाजपा नेत्यांकडून प्रत्युत्तर येऊ लागलं आहे.

BJP leader Raosaheb Danve criticized Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचं भाषण करमणूक करणारं, धोरणात्मक नाही; रावसाहेब दानवेंनी उडवली खिल्ली

उद्धव ठाकरेंचं भाषण करमणूक करणारं, धोरणात्मक नाही; रावसाहेब दानवेंनी उडवली खिल्ली

मुंबई - जाऊ द्या घरी, वाजले की बारा हे धंदे उद्धव ठाकरेंनी केलेत. ते राहून राहून डोक्यात येते. आता त्याला शब्दाची जोड देऊन करमणूक करण्याचं काम आहे. शब्दप्रयोग करून करमणूक करणारी भाषणे झालीत. धोरणात्मक भाषण होत नाही त्यामुळे त्यांच्या भाषणाकडे फारसं लक्ष द्यायची गरज नाही असा टोला भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी लगावला आहे.

रावसाहेब दानवे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी भाषणात पुढची दिशा आणि विजय यावर भाष्य करायला हवं होतं. परंतु ते न करता नेहमीप्रमाणे शिवराळ भाषा वापरून मोदींवर टीका केली. ते एका नशेत आहेत. प्रत्येक भाषणात तोच तोच मुद्दा मांडतात. त्याला लोकही कंटाळलेत. जर त्यांना स्वत:ला वाटत असेल आम्ही सत्तेत येऊ तर आल्यानंतर काय करणार हे म्हणणं ठीक आहे. ब्रँड संपला ब्रँडी आली ही भाषा त्यांच्यासाठीच योग्य आहे. देशातील जनतेचा मोदींवर विश्वास आहे, त्यामुळे तिसऱ्यांदा ते पंतप्रधान झालेत असंही त्यांनी सांगितले.

तसेच उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री असताना केवळ दोनदा मंत्रालयात आले, ते शरद पवारांनी पुस्तकात मांडलं आहे. उद्धव ठाकरेंनी कधीही राज्याचं व्हिजन भाषणात मांडलं नाही आणि आताही मांडत नाही. मोदी देशाला २०४७ पर्यंतचं व्हिजन देतायेत. उद्धव ठाकरेंचं भाषण १० मिनिटांत संपतं, आता हिंदू बांधवांनो म्हणतही नाहीत. उद्धव ठाकरेंनी फार तीर मारला नाही. ९ जागा निवडून आणल्यात. शरद पवारांच्या ८ जागा निवडून आल्यात. नरेंद्र मोदींच्या २४० जागा निवडून आल्यात. २४० जागा निवडून आणणारा नेता एकाबाजूला आणि ९ जागा निवडून आणणारा नेता चॅलेंज करतो अशी खिल्लीही दानवेंनी उद्धव ठाकरेंची उडवली. 

दरम्यान, उद्धव ठाकरेंची भाषणं टीका केल्याशिवाय होत नाहीत. माझ्यावर टीका करतात. शरद पवारांच्या घराबाहेर उभे असलेले उद्धव ठाकरे मी पाहिलेत. धोरणात्मक विषयावर बोलतच नाही. टीकेशिवाय काय केले असा सवालही रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरेंना केला. त्याशिवाय महायुतीत जागावाटपाचा वाद नाही. तिन्ही पक्षाचे नेते समंजदार आहेत, या राज्याची सत्ता आम्ही पुन्हा मिळवू असंही दानवेंनी म्हटलं. 
 

Web Title: BJP leader Raosaheb Danve criticized Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.