मी आणि कुटुंब असे म्हणत मुख्यमंत्री घरातच बसले, रावसाहेब दानवेंचा निशाणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2020 09:46 AM2020-10-18T09:46:54+5:302020-10-18T09:50:00+5:30
हे सरकार अमर, अकबर, अँथनीसारखे आहे. माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी राज्यभर दौरे करीत आहेत. मात्र 'मी आणि माझे कुटुंब' म्हणत राज्याचे प्रमुख घरात बसले असल्याचे चित्र आहे. (Raosaheb Danve)
औरंगाबाद : कोरोना महामारीच्या, तसेच अतिवृष्टीच्या काळात राज्यकर्त्यांनी दौरे करून जनतेला दिलासा द्यायला हवा. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 'मी आणि माझे कुटुंब' असे म्हणत घरातच बसले आहेत. त्यामुळे राज्य चालवणे हे 'येड्या गबाळ्याचे' काम नव्हे, अशा कडक शब्दांत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्यातील आघाडी सरकारसह मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीका केला. शनिवारी पैठण येथे विविध विकास कामांचे उद्घाटन दानवे यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
दानवे म्हणाले की, हे सरकार अमर, अकबर, अँथनीसारखे आहे. माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी राज्यभर दौरे करीत आहेत. मात्र 'मी आणि माझे कुटुंब' म्हणत राज्याचे प्रमुख घरात बसले असल्याचे चित्र आहे. केंद्राचे कृषी विधेयक शेतकऱ्यांच्या हिताचे असून, बाजार समितीच्या आस्तित्वाला कुठेही धक्का लागणार नाही. आघाडी सरकारने या विधेयकाला विरोध केला असून, विधेयकाला दिलेली स्थगितीही बेकायदा असल्याचे दानवे यावेळी म्हणाले.