मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सचिन वाझेंसाठी इतक्या बैठका का घेतायत; भाजपचा थेट सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 05:02 PM2021-03-17T17:02:26+5:302021-03-17T17:05:48+5:30
Sachin Vaze: मुख्यमंत्री सचिन वाझे यांच्यासाठी इतक्या बैठका का घेत आहेत, असा सवाल भाजपकडून करण्यात आला आहे.
मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी, गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू (Mansukh Hiren Death Case) आणि त्यानंतर पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांना झालेली अटक या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. यातच आता मुख्यमंत्री सचिन वाझे यांच्यासाठी इतक्या बैठका का घेत आहेत, असा सवाल भाजपकडून करण्यात आला आहे. (bjp leader sanjay kute slams thackeray govt over sachin vaze issue)
भाजप नेते संजय कुटे यांनी भाजप मुख्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यासाठी रात्रंदिवस बैठका घेणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेच्या प्रश्नांसाठी बैठकाचा असाच धडाका कधी लावणार, अशी विचारणा कुटे यांनी केली आहे.
गृहमंत्री महोदय... तुम्ही नेमकं केलं काय? भाजपचा अनिल देशमुखांवर जोरदार हल्लाबोल
सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी बैठका कधी
इतरवेळेस दुपारनंतर शासकीय कामकाजाला सुरूवात करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेल्या तीन दिवसांपासून बैठकामागून बैठका घेत आहेत. ही आश्चर्यजनक बाब आहे. वाझे यांच्यासाठी एवढ्या तत्परतेने बैठका घेतल्या जात आहेत, तशा बैठका सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कधी घेतल्या जाणार, असा प्रश्न सामान्य माणसाला पडला आहे, असे कुटे यांनी सांगितले.
महाविकास आघाडी सरकामुळे शेतकरी अडचणीत
महाविकासआघाडी सरकारने सत्तेत आल्यावर पीक विमा योजनेचे निकष बदलल्यामुळे राज्यातील शेतकरी पीक विमा योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेले आहेत. नैसर्गिक संकटामुळे सोयाबीन, उडीद, कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत, असे कुटे म्हणाले.
महाविकास आघाडी सरकार दुटप्पी
महाविकास आघाडी सरकार किती दुटप्पी आहे. सक्तीच्या वीजबिल वसुलीचे सुलतानी संकटही शेतकऱ्यांवर कोसळले आहे. विधानसभेत वीज बील वसुलीस स्थगिती दिल्याचे आश्वासन दिल्यानंतर विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ही स्थगिती उठवण्यात आली. कोरोनाच्या नावाखाली सर्व प्रश्नांपासून पळ काढणारे हे सरकार प्रत्यक्षात कोरोना परिस्थितीही आटोक्यात ठेवण्यात अपयशी ठरलेले आहे, असा आरोप कुटे यांनी केला आहे.