'...तर भाजपा सरकार स्थापन करण्यासाठी तयार आहे'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 09:10 AM2020-01-30T09:10:50+5:302020-01-30T09:18:07+5:30
शिवसेनेला काँग्रेसचा पाठिंबा हे २१व्या शतकातील सर्वात मोठे आश्चर्य आहे.
राज्यातील सत्तास्थापनेवरून शिवसेना-भाजपतील मतभेद प्रचंड विकोपाला गेल्याने 30 वर्षाची युती तोडून शिवसेनेने भिन्न विचारसारणीचे पक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊन महाविकाआघाडीचे सरकार स्थापन केले. मात्र शिवसेनेने सत्तास्थापनेचा उद्याही प्रस्ताव दिला तर भाजपा शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्यास तयार असल्याचे मत भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले आहे. नांदेडच्या दौऱ्यावर असताना भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी हे विधान केले आहे.
सुधीर मुनगंटीवार म्हणले की, शिवसेना हा पक्ष भाजपाचा नैसर्गिक मित्र आहे. शिवसेनेनं उद्याही प्रस्ताव दिला, तर सरकार स्थापन करण्यासाठी भाजपाकडून अडचण नाही. तसेच शिवसेना पक्ष भाजपचा नैसर्गिक मित्र आहे. त्यामुळे सारे काही विसरून शिवसेनेने भाजपपुढे प्रस्ताव ठेवल्यास 'सुबह का भुला श्याम को लौट आया' असे समजून आम्ही त्याचा विचार करू असं मत सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले आहे.
शिवसेनेला काँग्रेसचा पाठिंबा हे २१व्या शतकातील सर्वात मोठे आश्चर्य असल्याचे देखील सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. तसेच अशोक चव्हाण यांच्या म्हणण्यानुसार फक्त भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी मुस्लिमांच्या सांगण्यावरूनच ते सत्तेत गेले, असे सांगत शिवसेनेकडून काँग्रेसने लेखी हमी घेतल्याच्या चव्हाणांच्या दाव्यावरही मुनगंटीवार यांनी टोला लगावला आहे. मुंबईतील मातोश्री आज शक्तिहीन झालीय तर दिल्लीची मातोश्री शक्तिशाली झाली असल्याचे देखील सुधीर मुनगंटीवर यांनी यावेळी सांगितले.
18 जून 2019 रोजी विधीमंडळात सादर झालेल्या अर्थसंकल्पात चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया या तीन नक्षलप्रभावित जिल्हयांमध्ये तरूणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या, यासाठी तीन वर्षात 500 कोटींचा आराखडा तयार करण्याचा संकल्प जाहीर करण्यात आला होता. दरवर्षी 175 कोटी रू. निधी या तीन जिल्ह्यासाठी आवंटीत करण्याची घोषणासुध्दा करण्यात आली होती. सदर योजना पुढे नेत या वर्षी यासाठी 175 कोटी रू. निधी उपलब्ध करून देण्याची मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.