कटुता नाही! मोदी-पवारांच्या भेटीवर मुनगंटीवारांचं सूचक विधान; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 02:35 PM2022-04-06T14:35:16+5:302022-04-06T14:37:37+5:30
पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात २५ मिनिटं खलबतं; भेटीवर मुनगंटीवारांचं अतिशय सूचक विधान
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास २५ मिनिटं चर्चा झाली आहे. या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली, त्याबद्दलचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. मात्र या भेटीची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. या भेटीवर माजी मंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे.
राजकीय मतभेद असले तरीही मनभेद असता कामा नये अशी आपली राजकीय संस्कृती आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनला नितीन गडकरी उपस्थित होते आणि आज पंतप्रधान मोदी, शरद पवारांची भेट झाली. लढाई विचारांची असते. मात्र मोदी आणि पवार एकमेकांचा आदरच करतात, असं मुनगंटीवारांनी एबीपी माझाला सांगितलं.
राष्ट्रवादीचे दोन बडे नेते तुरुंगात असताना, अनेक नेत्यांवर ईडी, आयकर विभागाच्या धाडी पडत असल्यानं कटुता निर्माण झाली असताना पवार आणि मोदी यांची भेट होते. त्यामुळे या भेटीकडे कसं पाहायचं असा प्रश्न मुनगंटीवारांना विचारण्यात आला. त्यावर राष्ट्रवादी आणि भाजपच्या संबंधांत कटुता आलेली नाही. शिवसेना आणि भाजपच्या संबंधांमध्ये मात्र खूप कटुता आल्याचं ते म्हणाले.
२०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपची युती होती. मतदारांनी युतीला कौल दिला. मात्र शिवसेनेनं बेईमानी केली. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये कटुता आहे. राष्ट्रवादीसोबत आम्ही निवडणूक लढलोच नव्हतो. त्यांनी आमच्याशी बेईमानी केलेलीच नाही. त्यामुळे कटुतेचा प्रश्न येत नाही, असंही मुनगंटीवार यांनी म्हटलं.
केंद्रात मोदींच्या नेतृत्त्वाखाली भाजपचं सरकार आहे. राज्यातही भाजप-शिवसेनेचं सरकार यावं यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली. शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार केला. तसेच शिवसैनिकही भाजपच्या उमेदवारांसाठी राबले. मात्र शिवसेनेनं मुख्यमंत्रिपदासाठी बेईमानी केली, असं मुनगंटीवार यांनी सांगितलं.
राष्ट्रवादीचे दोन बडे नेते केंद्रीय तपास यंत्रणांमुळे तुरुंगात असूनही भाजप-राष्ट्रवादीत कटुता नाही का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर केंद्रीय तपास यंत्रणा त्यांचं काम करत आहेत. नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांचा अर्थ राष्ट्रवादी पक्ष असा होत नाही. ते दोन नेते म्हणजे राष्ट्रवादी नाही. भाजप-शिवसेना संबंध कटुता आली आहे. राष्ट्रवादी-भाजप संबंधांमध्ये कटुता आलेली नाही, या विधानाचा मुनगंटीवार यांनी पुनरुच्चार केला.