Maharashtra Politics: “संजय राऊतांच्या प्रयोगाचा भाजपलाच फायदा; उद्धव ठाकरेंची चिडचिड होते, कारण...”
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 01:04 PM2023-01-24T13:04:15+5:302023-01-24T13:05:30+5:30
Maharashtra News: सत्ता गेल्यामुळे उद्धव ठाकरेंच्या मनात खदखद आहे. ठाकरे सरकारच्या अनेक धोरणांमुळे जनतेला फक्त त्रास झाला, अशी टीका भाजपकडून करण्यात आली.
Maharashtra Politics: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप, पंतप्रधान मोदी तसेच शिंदे गटावर सडकून टीका केली. मुंबई महानगरपालिका निवडणुकीपासून ते बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राच्या अनावरणावरून उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना कोपरखळ्या दिल्या. याला आता भाजप नेत्यांकडून प्रत्युत्तर देण्यात येत असून, संजय राऊतांच्या प्रयोगाचा भाजपलाच फायदा होणार असल्याचा टोला लगावण्यात आला आहे.
भाजप नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना ठाकरे गटावर पलटवार केला आहे. शिवसेनेकडून आम्हाला अपेक्षा होती. पण काही लोकांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांच्या विरुद्धच वागायचे ठरवले असेल तर काही उपयोग नाही. ज्या दिवशी काँग्रेससोबत जायचे असेल त्यादिवशी माझे दुकान बंद करेल, असे बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. पण कधी कधी मला वाटते की, मतदारांनी आणि लोकांनी भाजपसाठी अनुकूल व्हावे, म्हणून कदाचित संजय राऊत नवनवीन प्रयोग करत असावे, असा खोचक टोला सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला.
अनेक धोरणांमुळे जनतेला फक्त त्रास देण्याचे काम झाले
सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंवरही हल्लाबोल केला. सत्ता गेल्यामुळे उद्धव ठाकरेंच्या मनात खदखद आहे. त्यामुळेच शब्दांच्या माध्यमातून ते चिडचिड व्यक्त करत असतात. सत्ता गेल्यानंतर उद्धव ठाकरेंचे एकही भाषण नाही, ज्यामध्ये त्यांनी राज्यातल्या जनतेसाठी त्यांच्या काळात घेतलेला एखादा निर्णय सांगितला असेल. कोरोनाच्या धास्तीमुळे मंदिरे बंद ठेवली, पण मद्यालये सुरु केली. मुंबईत दोन दिवसांचे अधिवेशन व्हायचे, पण नागपूरचे अधिवेशन घेतले नाही. धान देण्यात भ्रष्टाचार होतो, असे सांगत शेतकऱ्यांना बोनस दिला नाही. अशा एक ना अनेक धोरणांमुळे जनतेला फक्त त्रास देण्याचे काम झाले, अशी घणाघाती टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
दरम्यान, शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनीही उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. वडील म्हणून ज्यांचे नाव लावता त्यांचे तैलचित्र लावताना राजकारण का करता, अशी विचारणा करत, उद्धव ठाकरे यांनी मनाचा मोठेपणा दाखवून कार्यक्रमाला यायला हवे होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिवशी तरी ठाकरे गटाने राजकारण बाजूला ठेवायला हवे होते. कारण हा काही राजकीय कार्यक्रम नव्हता. अशा कार्यक्रमातूनही जर राजकारण करत असाल तर चुकीचे आहे. प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचे आणि इतरांना बदनाम करायचे असेल तर त्याची नोंद महाराष्ट्र घेईल, अशी टीका रामदास कदम यांनी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"