ब्रह्मांड असेपर्यंत छत्रपतींची बरोबरी कोणीही करू शकणार नाही; अखेर राज्य भाजपानं मौन सोडलं
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 12:04 PM2020-01-13T12:04:54+5:302020-01-13T12:37:49+5:30
भाजपा कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आलेलं 'आज के शिवाजी- नरेंद्र मोदी' पुस्तक वादात
मुंबई: ब्रह्मांड असेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची बरोबरी कोणीही करू शकत नाही. शिवरायांची तुलना कोणासोबतही होऊ शकत नाही, अशा शब्दांत माजी मंत्री आणि भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी 'आज के शिवाजी- नरेंद्र मोदी' या पुस्तकाबद्दल भूमिका स्पष्ट केली. काल भाजपाच्या दिल्लीतल्या कार्यालयात प्रकाशित झालेलं 'आज के शिवाजी- नरेंद्र मोदी' हे पुस्तक अतिशय वादग्रस्त ठरलं आहे. मोदी आणि शिवरायांची तुलना करण्यात आल्यानं सर्वच स्तरातून भाजपावर टीका करण्यात येत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही, हे वारंवार स्पष्ट करताना मुनगंटीवार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरदेखील भाष्य केलं. राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्यानं पवारांवर जाणता राणा पुस्तक लिहिलं होतं. प्रत्येक पक्षात असे कार्यकर्ते असतात. जाणते राजे केवळ छत्रपती शिवाजी महाराज होते. शिवरायांची तुलना पंतप्रधान मोदी, शरद पवारांसोबत होऊ शकत नाही, असं मुनगंटीवार म्हणाले.
'या मंडळींना आवरा'; शिवाजी महाराज- मोदी बरोबरीवरून शिवेंद्रराजेंनी दिली समज
देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी त्यांच्या डिस्कव्हरी ऑफ इंडिया पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अतिशय अश्लाघ्य लिखाण केलं होतं. मध्य प्रदेश काँग्रेसच्या पुस्तिकेत स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अतिशय अपमानास्पद मजकूर छापण्यात आला. काँग्रेसनं कायम अशाप्रकारचं घाणेरडं राजकारण केलं. मात्र भाजपा खालच्या थराला जाऊन राजकारण करत नाही. त्यामुळेच माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींनी इंदिरा गांधींची तुलना दुर्गेशी केली होती, याची आठवण मुनगंटीवार यांनी करुन दिली.
मोदी आणि शिवरायांची तुलना राज्यातल्या भाजपा नेत्यांना मान्य आहे का?; शिवसेनेचा सवाल
सध्या काही जणांकडून मोदी द्वेषाचं राजकारण सुरू आहे. मोदी देशाला विकासाच्या मार्गानं नेत आहेत. मोदींमुळे जगभरात देशाची प्रतिमा उंचावली आहे. देशासमोरील अनेक गुंतागुंतीचे प्रश्न सोडवण्याचं धाडस मोदींनी दाखवलं आहे. मात्र काहींनी हे पाहवत नसल्यानं त्यांच्याकडून घाणेरडं राजकारण सुरू असल्याचा आरोप मुनगंटीवार यांनी केला.
मोदींची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करणाऱ्या पुस्तकाचा भुजबळांकडून खरपूस समाचार, म्हणाले...
आपल्या पक्षाला दैवत मानणारे कार्यकर्ते प्रत्येक पक्षात असतात, असं मुनगंटीवार म्हणाले. यासाठी त्यांनी उदाहरणंदेखील दिली. एका कार्यकर्त्यानं माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचं मंदिर बांधलं होतं. इंदिरा इज इंडिया असंदेखील म्हटलं गेलं होतं. शरद पवारांच्या एका कार्यकर्त्यानं जाणता राजा नावाचं पुस्तक लिहिलं होतं, असे संदर्भ मुनगंटीवार यांनी दिले.