"मुख्यमंत्र्यांकडे सर्वात मोठे सल्लागार - भीष्म पितामह, ते सल्ला देतील"- भाजपाचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 07:54 PM2022-06-27T19:54:02+5:302022-06-27T19:58:17+5:30
भाजप अजूनही वेट अँन्ड वॉचची भूमिकेत असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली.
सध्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेच्या अनेक आमदारांनी बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांची साथ दिली आहे. दरम्यान, राजकीय घडामोंडींच्या पार्श्वभूमीवर सोमवारी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा की देऊ नये यावर मी काय सल्ला देणार? त्यांच्याकडे सर्वात मोठे सल्लागार आहेत. पितामह भीष्म. ते त्यांना सल्ला देतील. शेवटी कौरव सेनेला पीतामह भीष्मानींच सल्ला द्यायचा असतो, असा टोला मुनगंटीवार यांनी लगावला.
पर्यायी सरकारचा आज विषय उपलब्ध होत नाही. जेव्हा जागा रिकामी होईल तेव्हाच हा विषय असतो, असंही त्यांनी एका प्रश्नाचं उत्तर देताना म्हटलं. एकनाथ शिंदे यांनी त्यांची मूळ शिवसेना असल्याचं सांगितले आहे. भाजप राजकीय अस्थिरतेत काय भूमिका घ्यावी यावर बैठकीत चर्चा झाली आहे. परंतु अजूनही वेट अँन्ड वॉचची भूमिका घेतली आहे. राज्याच्या विकासासाठी आणि लोकांच्या हिताचा निर्णय भाजपा घेईल. पुढील काळात प्रस्ताव येतील त्यावर कोअर कमिटी बसून योग्य तो निर्णय घेईल, असंही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं.
सरकार स्थापनेबद्दल चर्चा नाही
सरकार स्थापनेबाबत कुठलीही चर्चा बैठकीत झाली नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला असताना त्यांच्या पक्षाच्या आमदारांनी केलेला आग्रह यावर भाजपा लक्ष ठेवून असल्याचंही त्यांनी सांगितलं. शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांच्याकडून आम्हाला कोणताही प्रस्ताव आलेला नाही. चर्चेनंतर आम्ही वेट अँड वॉचची भूमिका घेण्याचा निर्णय घेतला. आम्हाला बहुमताची मागणी करण्याची आज तरी गरज वाटत नाही. यानंतर प्रत्येक घटनेनंतर मंथन आणि चर्चा होईल, असंही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं.