भाजपाची मनसेला साथ; महापालिकेच्या निवडणुकीत देणार एकमेकांना मदतीचा हात?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2020 05:51 PM2020-03-09T17:51:01+5:302020-03-09T17:53:40+5:30
राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर नवी मुंबई महापालिका निवडणूक सर्वच पक्षांच्या दृष्टीने महत्वाची आहे.
मनसेच्या चौदाव्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यात मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी सरकारवर वचक ठेवण्यासाठी मनसेच्या शॅडो कॅबिनेटची घोषणा केली. राज्य सरकारचे वाभाडे काढण्यासाठी शॅडो कॅबिनेट तयार केले असल्याचे राज ठाकरेंनी सांगितले. तसेच सरकारने एखादी चांगली गोष्ट केल्यास या शॅडो कॅबिनेटकडून अभिनंदनही करण्यात येईल असं राज ठाकरेंनी स्पष्ट केले आहे.
मनसेच्या शॅडो कॅबिनेटचे भाजपाकडून स्वागत करण्यात आले आहे. राज्य सरकार जर चुकीचे निर्णय घेत असेल तर मनसेचे शॅडो कॅबिनेट जनतेला पटवून देईल असं भाजपाचे नेते विनोद तावडे यांनी सांगितले. तसेच महाविकास आघाडीच्या सरकारला आता 100 दिवस पू्र्ण झाले आहे. त्यामुळे सरकार जनतेच्या हिताचे काम करेल असा विश्वास देखील विनोद तावडे यांनी व्यक्त केला आहे.
मनसेचे नेते अनिल शिदोरे यांनी पक्षाच्या शॅडो कॅबिनेटची घोषणा केली. त्यात अनेक महत्त्वाच्या नेत्यांना स्थान देण्यात आलं आहे. मनसेचं हे शॅडो कॅबिनेट सरकारच्या चुकीच्या कारभाराचे वाभाडे काढण्यासाठी आहे, असं राज ठाकरे यांनी यावेळी बोलताना सांगितलं. ब्लॅकमेल करणारे आरटीआय टाकायचे नाहीत, अशी ताकीदही राज ठाकरे यांनी शॅडो कॅबिनेटमधील नेत्यांना दिली आहे.
महाराष्ट्रातील विविध प्रश्नांसाठी आणि समाजगटांसाठी काम करणारं हे खातं आहे. सरकारचं वाभाडे जिथे काढायचे आहेत तिथे वाभाडे काढा आणि जिथे सरकार चांगलं काम करेल तिथं त्यांचं अभिनंदन पण करू
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) March 9, 2020
#मनसे_वर्धापनदिन#राज_ठाकरे_लाईव्ह
दरम्यान, राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर नवी मुंबई महापालिका निवडणूक सर्वच पक्षांच्या दृष्टीने महत्वाची आहे. यातच मनसेदेखील पहिल्यांदाच नवी मुंबईत महापालिका निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. विधानसभा निवडणुकीत मनसेच्या दोन उमेदवारांना ५० हजारांच्या अधिक मतदान झालं होतं. युती आणि आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढणाऱ्या पक्षांच्या विरोधात मनसेने स्वबळावर घेतलेले मतदान याकडे गांभीर्याने पाहायला हवं. मनसेने मागील काही वर्षात नवी मुंबईत विविध आंदोलनाच्या माध्यमातून आपली छाप पाडली आहे.
महापालिका निवडणुकीत जर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येऊन निवडणूक लढवणार असल्यामुळे भाजपाला एखाद्या मित्रपक्षाची गरज भासणार आहे. तसेच मनसेने हिंदुत्वाची भूमिका स्विकारल्याने भाजपाकडून मनसेला सोबत घेण्याचे प्रयत्न होऊ शकतात. मनसे आणि भाजपाची विचारसरणी वेगळी आहे. मात्र मनसेने आणखी व्यापक भूमिका घेतली तर भविष्यात युतीबाबत विचार होऊ शकतो असं मत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले होते.