केंद्रीय अर्थसंकल्पाचा संदेश भाजपाचे नेते गावोगावी पोहचविणार - चंद्रकांत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 04:34 PM2022-02-02T16:34:58+5:302022-02-02T16:35:44+5:30
Chandrakant Patil : महाराष्ट्र भाजपाचे पदाधिकारी गावोगावी हा संदेश जनतेपर्यंत पोहचवतील, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
मुंबई : मंगळवारी केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी देशाचा अर्थसंकल्प 2022-23 (Union Budget 2022) सादर केला. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी बुधवारी भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तसेच, अर्थसंकल्पाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या कामगिरीबाबत नरेंद्र मोदींनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी देशभरातील भाजपाच्या एक लाख 80 हजार नेत्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला आणि केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाचा अर्थ सोप्या भाषेत समजून दिला. दरम्यान, महाराष्ट्र भाजपाचे पदाधिकारी गावोगावी हा संदेश जनतेपर्यंत पोहचवतील, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil) यांनी सांगितले.
चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात मुंबई भाजपा प्रदेश कार्यालयात पक्षाचे पदाधिकारी या देशव्यापी संवाद उपक्रमात सहभागी झाले. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी, संजय कुटे, सुनील कर्जतकर, राज पुरोहित, जयप्रकाश ठाकूर, प्रदेश सरचिटणीस (मुख्यालय) अतुल वझे व प्रदेश चिटणीस संदीप लेले उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत सोप्या शब्दात वेगवेगळ्या समाज घटकांना केंद्रीय अर्थसंकल्पाचा कसा लाभ होणार आहे, हे सांगितले. शेतकऱ्यांना दीर्घकाळ उपयोगी पडणारा शेतकरी ड्रोनचा उपक्रम, ग्रामीण महिलांचे पाणी आणण्याचे कष्ट वाचविण्यासाठी प्रत्येक घराला नळाने पाणी देण्याची साठ हजार कोटींची योजना, ऐंशी लाख घरे असे विविध प्रस्ताव मोदीजींनी नेते समजून दिले. क्रिप्टो करन्सी, डिजिटल बँकिंग असे विषयही मोदीजींनी समजून दिले. तसेच, आता पक्षाचे नेते हा संदेश गावोगावी पोहोचवतील, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.