भाजपा नेत्यांचा मेंदू तपासावा लागेल
By admin | Published: February 17, 2017 03:00 AM2017-02-17T03:00:13+5:302017-02-17T03:00:13+5:30
‘सामना’वर मतदानाच्या काळात बंदी घालण्याच्या भाजपा नेत्यांच्या वक्तव्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका
नागपूर : ‘सामना’वर मतदानाच्या काळात बंदी घालण्याच्या भाजपा नेत्यांच्या वक्तव्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. आजवर ‘सामना’वर बंदीची मागणी पाकिस्तानमधून होत होती. मात्र त्या ‘सामना’वर बंदीची मागणी आता आमचे मित्र करीत आहेत. त्यामुळे या लोकांचा मेंदू तपासावा लागेल. यांचे हृदय कुणासाठी धडधडतेय याची तपासणी करावी लागेल. भाजपाचे नेते घाबरले आहेत, त्यांच्यासाठी रक्तदान शिबिर आयोजित करून त्यांची तपासणी करू, असे राऊत म्हणाले.
महापालिकेच्या निकालानंतरही भाजपा-सेना एकत्र येण्याची शक्यता नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युती तुटल्याची घोषणा केल्यानंतर तलवारी बाहेर निघाल्या आहेत. त्या आता म्यान होण्याची शक्यता नाही, असे सांगत आम्ही केवळ सत्तेसाठी एकत्र येणार नाही, असे राऊत यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेच्या प्रचारार्थ खा. राऊत येथे आले असताना म्हणाले, मुंबईत नेहमीच शिवसेना जिंकत आली आहे. या वेळीही जिंकेल. उद्धव ठाकरे यांनी २६ जानेवारी रोजी युती तोडण्याची घोषणा केली. तेव्हापासूनच सरकारचा नोटीस पिरियड सुरू झाला, असेही त्यांनी स्पष्ट केले. संघाचे ज्येष्ठ नेते मा.गो. वैद्य यांनी आपले मार्गदर्शन ज्यांना गरज आहे, त्यांनाच द्यावे. भाजपामध्ये ‘पोलीस भरती’सारखी ‘गुंड भरती’ सुरू आहे. वैद्य यांनी आधी त्यांना मार्गदर्शन करावे, असा टोलाही त्यांनी लगावला. (प्रतिनिधी)
नागपूरचे काय शिकागो झाले का?-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधी नागपूरकडे लक्ष द्यावे, नंतर मुंबईकडे पाहावे. मुंबईची तुलना पाटण्याशी करण्यापेक्षा गुन्हेगारीत नागपूर बिहारपेक्षाही पुढे गेले आहे, अशी टीका करीत मग नागपूरचे काय शिकागो झाले का, असा खोचक सवालही त्यांनी केला.
विदर्भात ‘मिशन ५०’ : विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढताना सेना विदर्भात ‘मिशन ५०’ हाती घेऊन काम करेल. युतीमुळे नुकसान झाले नसते तर आणखी शिवसेना वाढली असती, असा आरोपही त्यांनी केला.