भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या भाजप नेत्यांचीच बंडाची तयारी !
By रवींद्र देशमुख | Published: December 13, 2019 10:53 AM2019-12-13T10:53:55+5:302019-12-13T10:56:16+5:30
माजी महिला व बालकल्यानमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर देखील चिक्की घोटाळ्याचे आरोप झाले होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यांना क्लिनचिट दिली होती. त्या आरोपांमुळे पंकजा अडचणीत आल्या होत्या. यावरून तत्कालीन विधान परिषद विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी त्यांना अनेकदा लक्ष्य केले होते.
- रवींद्र देशमुख
मुंबई - सत्ता जाताच भारतीय जनता पक्षामधील मतभेद चव्हाट्यावर येण्यास सुरुवात झाली आहे. आधी एकनाथ खडसे आणि त्यांच्यानंतर आता पंकजा मुंडे आणि प्रकाश मेहता यांनी उचल घेतली आहे. यामध्ये माजीमंत्री विनोद तावडे हे समोर आले होते. मात्र त्यांनी ऐनवेळी माघार घेत आपण आहे, त्यातच आनंदी असल्याचे स्पष्ट केले. मात्र खडसे, मुंडे आणि मेहता या तीन नेत्यांनी बंडखोरी केली नसली तरी आपली नाराजी व्यक्त केली आहे. नाराजी व्यक्त करणाऱ्या तिन्ही नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात सत्तेत आलेल्या भाजपच्या 2014 ते 2019 या कालावधीत एकनाथ खडसे, पंकजा मुंडे आणि प्रकाश मेहता हे मंत्रीपदी विराजमान होते. त्याच काळात या तिन्ही मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होेते. यामध्ये सर्वप्रथम नंबर लागला तो, एकनाथ खडसे यांचा, पुण्यातील एमआयडीसीत त्यांनी जमीन घेतल्याचा आणि दाऊदशी संपर्क असल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर त्यांचा मंत्रीमंडळात पुन्हा समावेश करण्यात आला नाही. तर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना भाजपकडून तिकीट देखील नाकारण्यात आले होते. त्यामुळे ते नाराज आहेत.
माजी महिला व बालकल्यानमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर देखील चिक्की घोटाळ्याचे आरोप झाले होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यांना क्लिनचिट दिली होती. त्या आरोपांमुळे पंकजा अडचणीत आल्या होत्या. यावरून तत्कालीन विधान परिषद विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी त्यांना अनेकदा लक्ष्य केले होते.
दरम्यान खडसे आणि पंकजा मुंडे यांच्या भूमिकेला पाठिंबा देणारे प्रकाश मेहता यांच्यावर देखील भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. झोपडपट्टी पुनर्विकास योजना राबविता विकासकाला झुकते माप दिल्याचा आरोप त्यांचावर होता. त्यामुळे अखेरच्या टप्प्यात मेहता यांची मंत्रीपदावरून उचलबांगली करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना तिकीट देखील नाकारण्यात आले. त्यामुळे ते देखील नाराज होते. अर्थात बंड न करता पक्ष नेतृत्वाविरुद्ध भूमिका घेणारे खडसे, मुंडे आणि मेहता तिन्ही नेत्यांवर आधीच भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत.