सिल्लोडमध्ये सामुहिक राजीनाम्यांची मोहीम; सत्तारांच्या उमेदवारीने भाजप नेते आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 05:46 PM2019-10-01T17:46:11+5:302019-10-01T17:46:24+5:30
गेल्या २५ वर्षापासून भाजपला सुटत असलेला सिल्लोड- सोयगाव विधानसभा मतदार यावेळी शिवसेनेला सुटला आहे.
- श्याम कुमार पुरे
मुंबई - सिल्लोड विधानसभेची जागा युतीच्या जागावाटपात शिवसेनेला सोडल्याने भाजपचे स्थानिक नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तर माजी आमदार अब्दुल सत्तार यांना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर झाल्याने भाजपच्या 588 पदाधिकाऱ्यांनी सामुहिक राजीनामे देण्याची भूमिका घेतली आहे. तालुक्यातील सर्व भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते सामूहिक राजीनामे देणार असल्याचा एक मुखी निर्णय सिल्लोड येथील भाजपच्या कार्यालयात आयोजित केलेल्या कार्यकर्ता बैठकीत घेण्यात आला.
गेल्या २५ वर्षापासून भाजपला सुटत असलेला सिल्लोड- सोयगाव विधानसभा मतदार यावेळी शिवसेनेला सुटला आहे. यामुळे भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यात नाराजी पसरली आहे. पक्षाने उमेदवारी बाबत पुनर्विचार केला नाही, तर हे राजीनामे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांच्या कडे बुधवारी देण्यात येतील याशिवाय मतदार संघातील गावागावातून सर्व भाजप कार्यकर्ते जिल्हा परिषद- पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रा. प. सदस्य विविध पदाधिकारी, कार्यकर्ते सामूहिक राजीनामे देतील. असा निर्णय यावेळी घेण्यात आला.
युतीचा निर्णय अंतिम झाला नसल्याने भाजपला हा मतदारसंघ सुटण्याची अपेक्षा स्थानिक भाजपच्या नेत्यांना होती. मात्र आज युतीच्या उमेदवाऱ्या जाहीर झाल्या असून सिल्लोड मतदारसंघ अधिकृतरीत्या शिवसेनेला सुटला असून, सत्तार यांनाच उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे सिल्लोड तालुक्यातील सर्व भाजप पुढारी सामूहिक राजीनामे देणार आहेत.
भाजपच्या वरिष्ठांनी या जागेचा पुनर्विचार केला नाही, तर या विधानसभा निवडणुकीत कुणाला उभे करायचे याचा एक मुखी निर्णय घेवून, आम्ही एकास एक उमेदवार मैदानात उतरवणार आहे. न्यानेश्र्वर मोठे ( भाजप तालुकाध्यक्ष )