कार्यपद्धतीत सुधारणा करा, भाजप नेतृत्त्वाकडून चंद्रकांत पाटलांना सूचना; दिल्लीत नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2021 10:24 AM2021-11-28T10:24:53+5:302021-11-28T11:21:40+5:30
भाजप नेतृत्त्व चंद्रकांत पाटील यांच्या कार्यपद्धतीवर नाराज; समन्वय वाढीसाठी महत्त्वाच्या सूचना
नवी दिल्ली/मुंबई: भारतीय जनता पक्षाचं नेतृत्त्व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर नाराज असल्याचं समजतं. कार्यपद्धतीत सुधारणा करा, नेत्यांमधील समन्वय वाढवा, संपूर्ण राज्यभर फिरा, अशा सूचना नेतृत्त्वाकडून पाटील यांना करण्यात आल्या. राज्यातील महाविकास आघाडी सरकारला घेरण्यात विरोधी पक्ष म्हणून भाजप कमी पडत असल्याचं नेतृत्त्वानं पाटील यांना स्पष्टपणे सांगितलं.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील शुक्रवारी दिल्लीच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, भाजपचे महासचिव बी. एल. संतोष यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत पक्ष नेतृत्त्वानं पाटील यांना सुनावल्याचं वृत्त एबीपी माझानं दिलं आहे. कार्यपद्धतीत सुधारणा करण्याच्या सूचना पाटील यांना देण्यात आल्या आहेत.
केंद्र सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यात भाजप कमी पडत आहे. राज्यातील भाजप नेत्यांमध्ये समन्वयचा अभाव आहे. महाविकास आघाडी सरकारला घेरण्यात भाजप कमी पडत आहे. नवाब मलिक प्रकरणात पक्ष कमी पडला. केवळ कोल्हापूर, पुण्यात फिरू नका, राज्यभर दौरे करा. नेते, कार्यकर्त्यांशी संवाद साधा, अशा सूचना नेतृत्त्वाकडून पाटील यांना करण्यात आल्या.
चंद्रकांत पाटील राज्य भाजपचं नेतृत्त्व एक टीम म्हणून करण्यात कमी पडत असल्याचं नेतृत्त्वाला वाटतं. त्यामुळेच नेते, कार्यकर्त्यांशी संवाद वाढवा. बऱ्याचदा समन्वय दिसत नाही. त्यावर काम करा. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यासाठी कामाला लागा, असे आदेश दिल्ली दौऱ्यात पाटील यांना देण्यात आले.