विदर्भात काँँग्रेसला खिंडार तर भाजपाला वैभव

By admin | Published: February 25, 2017 01:02 AM2017-02-25T01:02:04+5:302017-02-25T01:02:04+5:30

काँग्रेसचा एककाळ होता विदर्भात. निवडणूक कोणतीही असो, पक्षाच्या चिन्हावर रिंगणात असलेल्या कुणालाही विदर्भातील मतदार आपला कौल द्यायचे.

BJP lends victory to Vidarbha Congress | विदर्भात काँँग्रेसला खिंडार तर भाजपाला वैभव

विदर्भात काँँग्रेसला खिंडार तर भाजपाला वैभव

Next

गजानन चोपडे , नागपूर
काँग्रेसचा एककाळ होता विदर्भात. निवडणूक कोणतीही असो, पक्षाच्या चिन्हावर रिंगणात असलेल्या कुणालाही विदर्भातील मतदार आपला कौल द्यायचे. गेली अनेक वर्षे हीपरंपराच जणू वैदर्भियांनी जपली. मात्र नेहमी पाठीशी असणाऱ्या विदर्भातील मतदारांना काँग्रेसने गृहितच धरले. त्याचा परिणाम पुन्हा एकदा काल जाहीर झालेल्या निकाला जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत काँग्रेसला भोगावा लागला, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
मतदार जागरूक झाला आहे, असा संदेश या निवडणुकीच्या माध्यमातून देण्यात आला आहे. विदर्भातील सहापैकी चार जिल्हा परिषदांवर भाजपने मुसंडी मारत त्या ताब्यात घेतल्या. सुरुवाती पासूनच बॅकफूटवर असलेली काँग्रेस निकालातही माघारली. राजकीय तज्ज्ञ याची वेगवेगळी कारणमीमांसा करीत असले तरी निव्वल पोकळ आश्वासने देणाऱ्या ‘हाता’ला साथ देण्यापेक्षा ‘विकास की बात’ करणाऱ्यांसोबत जाणे मतदारांनी पसंत केले आहे.राज्याचे वित्तमंत्री असलेल्या सुधीर मुनगंटीवार आणि केंद्रीय गृहराज्य मंत्री असलेल्या हंसराज अहीर यांच्या चंद्रपूर जिल्ह्यात तर काँग्रेसला ओहोटीच लागली आहे. नगर पालिका निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतरही काँग्रेस नेत्यांची गटबाजी संपुष्टात आली नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील मतदारांनी स्पष्ट बहुमत देत मिनीमंत्रालयाची किल्ली भाजपला सोपविली. गटातटाच्या राजकारणात काँग्रेसचे कार्यकर्तेही पक्षापासून दुरावले. मुनगंटीवारांच्या बल्लारपूर मतदार संघात तर काँग्रेसचा पार सफाया झाला. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला खातेही उघडता आले नाही. तर शेतकरी संघटनेचा प्रभाव असलेल्या राजुरा मतदार संघातून संघटना पुरती बाद झाली. काँग्रेसने मात्र येथे आघाडी घेतली आहे.
गडचिरोलीत मतभेद विसरून काँग्रेसची मंडळी कामाला तर लागली मात्र या पक्षाला येथे दुसऱ्या क्रमांकावरच समाधान मानावे लागले. पालकमंत्री अम्ब्ररीशराव आत्राम यांच्या अहेरी मतदार संघात मात्र भाजपला जोरदार फटका बसला. मंत्री महोदयांची निष्क्रियता येथे पक्षाला भोवली. अन्यथा गडचिरोलीतही भाजपचा झेंडा फडकणे सहज शक्य होते. आदिवासी बांधवांनी मतदाना प्रती दाखविलेली जागरुकताही गडचिरोली जिल्ह्यात दखलनीय ठरली. माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या नातेवाईकांना पराभवाचा स्वाद चाखवत मतदारांनी घराणेशाही फेटाळून लावली. बंडखोरीच्या आजाराने ग्रासलेल्या वर्धा जिल्ह्यात भाजपला नुकसान होईल, हे भाकीत भाजपच्या पदरी घवघवीत यश पाडत मतदारांनी सपशेल खोटी ठरवित बंडखोरांना चांगलीच चपराक दिली. एकजुटीने काम करूनही काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आपला जम बसविता आला नाही. अवघ्या दोन जागांवर राष्ट्रवादीचे अस्तित्व या जिल्ह्यात टिकून आहे.
नोटबंदीचा कुठलाही परिणराम यवतमाळ जिल्ह्यात जाणवला नसून येथे राज्यमंत्री मदन येरावार यांच्या नेतृत्त्वात भाजपने चार जागांवरुन १६ जागांपर्यंतचीमजल मारली. तर ग्रासरूट नेटवर्कच्या आधारे शिवसेना येथे क्रमांक एकचा पक्ष ठरला. शिवसेनेचे राज्यमंत्री संजय राठोड यांनी तर आपल्या मतदार संघात सर्वच्या सर्व जागा सेनेच्या ताब्यात घेत आपले वर्चस्व सिद्ध केले. विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, वसंत पुरके सारखी दिग्गज मंडळीही काँग्रेसला जिल्ह्यात यश मिळवून देण्यात अपयशी ठरले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची येथे जोरदार पीछेहाट झाली आहे.
अमरावती महापालिकेत एकहाती सत्ता घेणाऱ्या भाजपला जिल्हा परिषदेत मात्र ते जमले नाही. विदर्भातील एकमेव जिल्हा परिषद काँग्रेसच्या ताब्यात आली आहे. काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर, आ. वीरेंद्र जगताप यांनी त्यांच्या मतदारसंघात निर्विवाद वर्चस्व कायम ठेवले. असे असले तरी भाजपची सदस्य संख्या जिल्हा परिषदेत वाढली आहे.गेल्या ६० वर्षांपासून अधिराज्य गाजविणाऱ्या काँग्रेस बुलडाणा जिल्ह्यात निम्म्यावर आली आहे. टीम वर्क आणि कुशल संघटन कौशल्याच्या आधारे भाजप बुलडाणा जिल्हा परिषदेत अव्वल ठरला आहे. कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर व आ. संजय कुटे यांच्या नेतृत्वात खामगाव व जळगाव जामोद तालुक्यात सर्वच्या सर्व जागांवर भाजपने कब्जा केला. काँग्रेसचे सरचिटणीस माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक, आ. राहूल बोंद्रे व आ. हर्षवर्धन सपकाळ यांची तगडी टीम काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारात उतरली खरी; मात्र भाजपची लाट ते थोपवू शकले नाहीत.

Web Title: BJP lends victory to Vidarbha Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.