Rajya Sabha Election: शिवसेनेप्रमाणेच भाजपाचा 'दुसरा' उमेदवार कोल्हापूरचा?; तिसऱ्याचं अजून ठरेना!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 08:01 PM2022-05-24T20:01:30+5:302022-05-24T20:15:25+5:30

Rajya Sabha Election: शिवसेनेप्रमाणेच भाजप आपला दुसरा उमेदवार कोल्हापूरचाच देणार असून यासाठी धनंजय महाडिक यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे.

bjp likely to contest second seat to dhananjay mahadik for rajya sabha election sources said | Rajya Sabha Election: शिवसेनेप्रमाणेच भाजपाचा 'दुसरा' उमेदवार कोल्हापूरचा?; तिसऱ्याचं अजून ठरेना!

Rajya Sabha Election: शिवसेनेप्रमाणेच भाजपाचा 'दुसरा' उमेदवार कोल्हापूरचा?; तिसऱ्याचं अजून ठरेना!

Next

मुंबई : राज्यातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी येत्या 10 जूनला निवडणूक होणार आहे. त्यामुळे या सहाही जागांसाठी शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून कोण उमेदवार असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या राज्यसभेच्या या निवडणुकीसाठी बरेच चेहरे चर्चेत आहेत. यातच संभाजीराजे छत्रपती यांनी अपक्ष म्हणून मैदानात उतरणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे ही निवडणूक रंजक झाली आहे. शिवसेनेने आपला सहावा उमेदवार कोल्हापूरातून दिला आहे. त्यामुळे शिवसेनेप्रमाणेच भाजप आपला दुसरा उमेदवार कोल्हापूरचाच देणार असून यासाठी धनंजय महाडिक यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे.

केंद्रीय मंत्री पियूष गोयल हे भाजपचे राज्यसभेसाठी पहिले उमेदवार निश्चित मानले जात आहेत. भाजपचे दुसरे उमेदवार म्हणून धनंजय महाडिक यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, अशी माहिती भाजपमधील विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. तर तिसरा उमेदवार द्यायचा की नाही, याबद्दल अजून चर्चा सुरू आहे. मतांची जुळवाजुळव कशी करता येईल, हे पाहून निर्णय घ्यावा लागेल. महाराष्ट्रात येत्या काळात निवडणुका असल्याने पराभव झाल्यास इमेजला धक्का बसू शकतो, अशीही शक्यता असल्याचे सुत्रांकडून समजते.

कोल्हापुरातून धनंजय महाडिक यांच्यावर राज्यसभा खासदारकीच्या माध्यमातून जबाबदारी देऊन येथील आगामी महापालिका, जिल्हा परिषद, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याची कामगिरी त्यांच्यावर देण्यात येणार असल्याचे समजते. तसेच, याआधी खासदारकी असताना त्यांना लागोपाठ तीन वर्षे संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

याचबरोबर, कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर, करवीर, हातकणंगले, शिरोळ, चंदगड आणि राधानगरी या विधानसभा मतदारसंघात धनंजय महाडिक यांनी युवाशक्तीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचे जाळे विणले असून त्यांना मानणारा मोठा मतदार वर्ग आहे. ही जमेची बाजू लक्षात भाजप त्यांना राज्यसभेवर पाठवून  पक्षबांधणीची जबाबदारी त्यांच्यावर सोपवणार असल्याचे सांगण्यात येत. त्यामुळे त्यांची उमेवारी निश्चित झाल्याचे समजते.

दुसरीकडे, राज्यसभेच्या सहाव्या जागेवरुन सुरु असलेल्या चर्चांना अखेर शिवसेनेने पूर्णविराम दिला आहे. सहाव्या जागेसाठी शिवसेनेने संभाजीराजे छत्रपतींना ऑफर दिली होती. परंतु संभाजीराजेंनी यावर काहीच प्रतिक्रिया न दिल्याने आता शिवसेनेने आपला उमेदवार निश्चित केला आहे. शिवसेनेने सहाव्या जागेसाठी कोल्हापुरातील शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार यांचे नाव शिक्कामोर्तब केले आहे. यासंदर्भात लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येईल, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

भाजपकडे 113  आमदारांचे संख्याबळ
भाजपकडे सध्या 113  आमदारांचे संख्याबळ आहे. भाजपचे 106  आमदार, रासप 1, जनसुराज्य 1 आणि अपक्ष पाच आमदार असे एकूण 113 आमदार भाजपकडे आहेत. राज्यसभेच्या एका जागेसाठी 42 मतांची गरज आहे. त्यामुळे भाजपला तिसरी जागा निवडून आणायची असेल तर फक्त 13 मतांची गरज आहे. महाविकास आघाडीकडे 169 आमदार आणि भाजपकडे 113 आमदार आहेत. संख्याबळानुसार भाजप दोन, शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एक उमेदवार सहज राज्यसभेवर निवडून जाऊ शकतात.

Web Title: bjp likely to contest second seat to dhananjay mahadik for rajya sabha election sources said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.