पहिल्या यादीत नेत्यांच्या नातेवाइकांना संधी; सेनेच्या ‘त्या’ ५ जागांवर भाजपने दिले उमेदवार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 01:12 PM2024-10-21T13:12:53+5:302024-10-21T13:15:35+5:30

आमदारांचे तिकीट कापून त्यांच्या पत्नीला संधी दिल्याची दोन उदाहरणे या यादीत आहेत

BJP list announced consist relatives of the leaders and the BJP has given candidates on 5 seats of the Shiv Sena | पहिल्या यादीत नेत्यांच्या नातेवाइकांना संधी; सेनेच्या ‘त्या’ ५ जागांवर भाजपने दिले उमेदवार

पहिल्या यादीत नेत्यांच्या नातेवाइकांना संधी; सेनेच्या ‘त्या’ ५ जागांवर भाजपने दिले उमेदवार

पवन देशपांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: शिवसेना २०१९ मध्ये जिथे पराभूत झाली अशा ५ जागांवर भाजपने उमेदवार दिले आहेत. या पाच जागांपैकी शिवसेना दोन ठिकाणी दुसऱ्या स्थानी, दोन ठिकाणी तिसऱ्या, तर एका जागेवर चौथ्या स्थानावर राहिली होती. २०१९ मध्ये धुळे शहर मतदारसंघात एमआयएम, देवळीमधून काँग्रेस, अचलपूरमध्ये प्रहार जनशक्ती, नालासोपाऱ्यातून बविआ, तर उरणमध्ये अपक्ष उमेदवाराने बाजी मारली होती.

  • धुळे शहर : ही जागा २०१९ मध्ये शिवसेनेने लढली होती. शिवसेनेचे हिलाल लाला माळी चौथ्या स्थानी होते. एमआयएमने ही जागा जिंकली होती. ही जागा आता भाजप लढणार असून अनुप अग्रवाल यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. 
  • देवळी : येथून शिवसेनेचे समीर देशमुख लढले होते; पण ते तिसऱ्या ठिकाणी राहिले. काँग्रेसचे रणजित कांबळे यांनी त्यांचा पराभव केला होता. भाजपने या जागेवर आता राजेश बकाने यांना उमेदवारी दिली आहे. २०१९ मध्ये अपक्ष लढलेले बकाने दुसऱ्या स्थानी राहिले होते.  
  • अचलपूर : येथून शिवसेनेच्या सुनीता फिस्के मैदाना होत्या; पण त्या तिसऱ्या स्थानी राहिल्या. बच्चू कडू यांनी त्यांचा पराभव केला होता. आता भाजपने येथून प्रवीण तायडे यांना उमेदवारी दिली आहे. 
  • नालासोपारा : २०१९ मध्ये या ठिकाणी शिवसेना दुसऱ्या स्थानी होती. बविआचे क्षितिज ठाकूर यांनी शिवसेनेच्या प्रदीप शर्मा यांचा पराभव केला होता. या जागेवर आता भाजपने राजन नाईक यांना उमेदवारी दिली आहे. 
  • उरण : अपक्ष उमेदवार महेश बालदी यांनी शिवसेनेच्या मनोहर भोईर यांना पराभूत केले होते. त्यानंतर बालदी यांनी भाजपला पाठिंबा दिला होता. या जागेवर आता भाजपने बालदी यांनाच उमेदवारी दिली आहे.


भाजपच्या पहिल्या उमेदवार यादीत भाजपमधील नेत्यांच्या नातेवाइकांचाही समावेश आहे. आमदारांचे तिकीट कापून त्यांच्या पत्नीला संधी दिल्याची दोन उदाहरणे या यादीत आहेत. माजी मंत्री बबनराव पाचपुते हे श्रीगोंदा, जि. अहमदनगरचे विद्यमान आमदार आहेत. त्यांना पुन्हा संधी न देता त्यांची पत्नी प्रतिभा यांना भाजपने उमेदवारी दिली आहे.

माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यसभा सदस्य अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया या भोकर (जि.नांदेड)मध्ये भाजपच्या उमेदवार असतील. २०१९ मध्ये अशोक चव्हाण या ठिकाणी निवडून गेले होते. त्यांनी याच वर्षी काँग्रेसचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला व ते भाजपमध्ये गेले. पक्षाने त्यांना राज्यसभेवर पाठविले. आता त्यांच्या परंपरागत भोकर मतदारसंघात त्यांच्या कन्येला संधी दिली आहे.

भाजपचे पिंपरी-चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मृत्यूनंतर भाजपने पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना संधी दिली, त्या निवडूनदेखील गेल्या होत्या. मात्र, यावेळी अश्विनी यांचे दीर शंकर जगताप यांना संधी दिली आहे. इचलकरंजीचे विद्यमान आमदार, माजी मंत्री प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. तर रावेर मतदारसंघातून दिवंगत नेते हरिभाऊ जावळे यांचा मुलगा अमोल जावळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपचे दिग्गज नेते आणि आता राजस्थानचे राज्यपाल असलेले हरिभाऊ बागडे यांच्या फुलंब्री (जि. छत्रपती संभाजीनगर) या परंपरागत मतदारसंघात अनुराधा चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली. अनुराधा यांचे पती अतुल चव्हाण हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता आहेत. त्या जिल्हा परिषद सदस्य, समाजकल्याण सभापतीही होत्या. 

पहिल्या यादीत दोन विधान परिषद सदस्य

भाजपच्या पहिल्या यादीत चंद्रशेखर बावनकुळे आणि राम शिंदे हे दोन विधान परिषद सदस्य आहेत. बावनकुळे यांना कामठीतून, तर शिंदे यांना कर्जत - जामखेड, जि. अहमदनगरमधून उमेदवारी मिळाली. २०१९मध्ये राम शिंदे यांचा राष्ट्रवादीचे रोहित पवार यांनी पराभव केला होता. यावेळीही या दोघांमध्येच लढत होणार हे स्पष्ट आहे.

लोकसभेला पराभूत, तरीही पुन्हा तिकीट

  1. लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात भाजपने मैदानात उतरविलेल्या पण पराभूत झालेल्या दोन आमदारांना विधानसभेची संधी देण्यात आली आहे. चंद्रपूरमध्ये राज्याचे विद्यमान मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांनी पराभव केला होता. मात्र, तरीही पक्षाने मुनगंटीवार यांच्यावरच विश्वास दाखवत बल्लारपूर मतदारसंघातून त्यांना मैदानात उतरविले आहे. 
  2. मुंबई उत्तर-पूर्व लोकसभा मतदारसंघातून मुलुंडचे आमदार मिहिर कोटेचा यांना भाजपने उमेदवारी दिली होती, पण उद्धवसेनेचे संजय दिना पाटील विजयी झाले. आता कोटेचा यांना मुलुंडमधून विधानसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. 


मुखेडमध्ये खतगावकर यांना धक्का

मुखेड (जि. नांदेड) येथून भाजपचे विद्यमान आमदार डॉ. तुषार राठोड यांनाच भाजपने पुन्हा उमेदवारी दिली. ही जागा शिंदेसेनेला जाईल आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पीएस बालाजी खतगावकर यांना तिथे उमेदवारी मिळेल, अशी चर्चा होती, पण भाजपने ही जागा शिंदेसेनेला सोडली नाही. खतगावकर यांनी काही महिन्यांपासून जोरदार प्रचार सुरू केला होता. महायुतीच्या जागावाटपात मुखेड मतदारसंघ भाजपला सोडण्यात आला आणि डॉ. तुषार राठोड यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली. असे असले तरी आपण अपक्ष लढण्यावर ठाम असल्याचे बालाजी खतगावकर यांनी जाहीर केले आहे.

Web Title: BJP list announced consist relatives of the leaders and the BJP has given candidates on 5 seats of the Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.