BJP Maharashtra: भाजपाकडून ४८ लोकसभा मतदारसंघांसाठी प्रचार प्रमुखांची घोषणा, या नेत्यांवर मोठी जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2023 04:12 PM2023-06-08T16:12:36+5:302023-06-08T16:14:10+5:30
BJP Maharashtra: पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे कडवे आव्हान भाजपासमोर असणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपाने महाविकास आघाडीचं आव्हान परतवून लावण्यासाठी जबरदस्त रणनीती आखली आहे.
वर्षभरापूर्वी शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचं सरकार पाडून भाजपाने एकनाथ शिंदेंसोबत सरकार स्थापन केलं होतं. मात्र पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे कडवे आव्हान भाजपासमोर असणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपाने महाविकास आघाडीचं आव्हान परतवून लावण्यासाठी जबरदस्त रणनीती आखली आहे. तसेच त्यासाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ४८ लोकसभा मतदारसंघांसाठी ४८ नेत्यांकडे प्रचारप्रमुख म्हणून जबाबदारी सोपवली आहे.
यामध्ये दक्षिण मुंबई मतदारसंघाची जबाबदारी मंगलप्रभात लोढा यांच्याकडे तर ठाणे लोकसभेची जबाबदारी विनय सहस्रबुद्धे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. मावळची जबाबदारी प्रशांत ठाकूर यांच्याकडे, तर रत्नागिरी-सिंधुदुर्गची जबाबदारी प्रमोद जठार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. सातारा लोकसभा मतदारसंघाचे प्रचारप्रमुख म्हणून अतुल भोसले यांची निवड करण्यात आली आहे. तर माढा लोकसभाचे प्रचारप्रमुख प्रशांत परिचारक असतील.
भाजपासाठी महत्त्वाच्या असलेल्या पुणे लोकसभा मतदारसंघाचे प्रचारप्रमुख म्हणून मुरलीधर मोहोळ यांची निवड करण्यात आली आहे. तर शिरूर मतदारसंघाची जबाबदारी महेश लांडगे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. बारातमती मदरारसंघात राहुल कुल यांच्याकडे प्रचारप्रमुखपद सोपवण्यात आले आहे.
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपा आणि शिवसेना युतीचे २०० हून अधिक आमदार निवडून आणण्याचे लक्ष्य भाजपाने समोर ठेवले आहे, अशी माहितीही बावनकुळे यांनी दिली.