राज्यमंत्र्याच्या हट्टापायी भाजपाची बैठक अमरावतीऐवजी मुंबईत

By admin | Published: October 2, 2016 01:35 AM2016-10-02T01:35:41+5:302016-10-02T01:35:41+5:30

भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक अमरावतीऐवजी आता मुंबईत ५ आणि ६ आॅक्टोबरला होणार असून गृह आणि नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या हट्टापायी

BJP meeting in front of Amethi, instead of Amravati, in Mumbai | राज्यमंत्र्याच्या हट्टापायी भाजपाची बैठक अमरावतीऐवजी मुंबईत

राज्यमंत्र्याच्या हट्टापायी भाजपाची बैठक अमरावतीऐवजी मुंबईत

Next

- यदु जोशी, मुंबई
भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक अमरावतीऐवजी आता मुंबईत ५ आणि ६ आॅक्टोबरला होणार असून गृह आणि नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या हट्टापायी हा बदल करण्यात आल्याची जोरदार चर्चा आहे.
डॉ. पाटील हे अमरावती पदवीधर मतदारसंघात भाजपाचे उमेदवार आहेत. ही निवडणूक नोव्हेंबरमध्ये होणे अपेक्षित होते. त्यामुळे या कार्यकारिणी बैठकीचा पाटील यांच्या निवडणुकीला फायदाच झाला असता. तथापि, निवडणूक आयोगाने मतदारयाद्या नव्याने तयार करूनच ही निवडणूक घ्यावी, असे फर्मान काढले. त्यामुळे ही निवडणूक आता जानेवारी वा फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली गेली आहे.
असे असले तरी नवीन मतदार नोंदणी करवून घेण्याची नवीनच डोकेदुखी भाजपासह सर्व पक्षांना लागली आहे. १ आॅक्टोबरपासून एक महिना ही नोंदणी करावी लागणार आहे. भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक ५ आणि ६ तारखेला अमरावतीमध्ये झाली तर मतदारनोंदणीची जबाबदारी असलेले अनेक कार्यकर्ते कार्यकारिणी बैठकीच्या तयारीमध्ये अडकून पडले असते. त्यामुळे बैठकीचे स्थळ बदलण्याची मागणी पुढे आली.
सूत्रांनी सांगितले की, कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर, राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील हे त्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना भेटले आणि स्थळ बदलण्याची मागणी केली. ती मान्य झाली असून आता बैठक मुंबईला होणार आहे. भाजपाच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले की मुंबईत बैठक घेतली म्हणजे दिल्लीतील नेत्यांना बैठकीसाठी येणे सोपे जाते हे कारण असू शकते. खा. रावसाहेब दानवे हे कोरियाच्या दौऱ्यावर असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. भाऊसाहेब फुंडकर यांना विचारले असता ते म्हणाले की, मतदार नोंदणी निकडीची आहे. कार्यकारिणी बैठकीच्या तयारीमध्ये कार्यकर्ते अडकून पडले असते. नंतर दसरा, दिवाळी समोर आहे. म्हणून आम्ही आग्रह धरला. राज्यमंत्री डॉ. पाटील यांना विचारल्यावर ते म्हणाले अमरावतीबाबत अंतिम निर्णय झालेला नव्हता. मुंबईत बैठक घेण्याचा निर्णय पक्ष पातळीवर झाला आहे. मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी प्रदेशाची बैठक ५ व ६ तारखेस दादरमधील मुंबई भाजपाच्या, ‘वसंत स्मृती’ कार्यालयाच्या सभागृहात होईल, असे सांगितले.

अमरावतीच्या बैठकीसाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली होती. एका मोठ्या हॉटेलमधील ८० रुम्स बूक करण्यात आल्या होत्या. बाहेरच्या १०० खोल्याही बूक झाल्या होत्या. तसेच, चमचमीत भोजनाचे काँट्रॅक्टदेखील देण्यात आले होते. बूकिंग रद्द झाल्याचे संबंधितांना सांगताना स्थानिक आयोजकांची कसरत होत आहे.

संधी गमावली : अमरावती भाजपामध्ये प्रचंड भांडणे आहेत. पालकमंत्री, स्थानिक आमदारांमधील संघर्ष लपून राहिलेला नाही. दहा नेत्यांची तोंडे दहा दिशेला आहेत. प्रदेश कार्यकारिणीच्या निमित्ताने सगळे एकत्र येऊन चांगला संदेश गेला असता पण, ती संधीदेखील हातची गेली. अमरावती विभागात भाजपाचे चार मंत्री असताना बैठकीची संधी टाळण्यात आल्याबाबत उलटसुलट चर्चा आहे.

Web Title: BJP meeting in front of Amethi, instead of Amravati, in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.