निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 06:24 AM2024-11-23T06:24:33+5:302024-11-23T06:25:13+5:30
Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024: फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचे सूत्रांनी सांगितले.
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर लगेच काय रणनीती असावी याबाबत भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर शुक्रवारी झाली. तसेच फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचे सूत्रांनी सांगितले.
भाजप नेत्यांच्या बैठकीला फडणवीस, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय, मोहित कंभोज आदी उपस्थित होते. याचवेळी फडणवीस आणि भूपेंद्र यादव या दोघांनीच वीस मिनिटे बंदद्वार चर्चा केली.
निकालानंतर महायुतीच्या आमदारांना मुंबईत कसे आणायचे, याबाबत चर्चा करण्यात आली. महायुतीतील तिन्ही पक्षांच्या आमदारांना जिथे गरज असेल तिथून विशेष विमानाने मुंबईत आणले जाण्याचीही शक्यता आहे. शक्यतो शनिवारी रात्री किंवा रविवारी हे आमदार मुंबईत पोहोचावेत अशा पद्धतीचे नियोजन करण्यात आले आहे.
१० ते १२ अपक्ष निवडून येतील
भाजपच्या गोटात असा अंदाज बांधण्यात आला आहे की अपक्ष, बंडखोर हे फार मोठ्या संख्येने निवडून येणार नाहीत. बऱ्याच मतदारसंघांमध्ये ते विजयाची समीकरणे बदलतील पण निवडून येणारे १०-१२ चेहरे असतील.
लाडकी बहीण योजना, ‘एक है तो सेफ है’चा नारा, केंद्र आणि राज्य सरकारच्या लोकाभिमुख योजनांना मतदारांनी मोठ्या प्रमाणात पसंती दिली आणि निकालामध्ये ते स्पष्टपणे दिसेल, असा विश्वास ज्येष्ठ नेत्यांनी बैठकीत व्यक्त केला.
रावसाहेब दानवे यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले की, महायुतीला पूर्ण बहुमत मिळणार असल्याने आम्हाला अपक्षांची गरज भासणार नाही, ते सोबत आले तर स्वागतच असेल. स्वबळावर सत्ता मिळेल असा आमचा विश्वास आहे.