ठाण्यात होमग्राऊंडवर भाजपा करतंय एकनाथ शिंदेंची कोंडी?; शिंदेसेनेची उघड नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 16:17 IST2025-01-29T15:53:32+5:302025-01-29T16:17:20+5:30
जनता दरबार घेण्यासाठी मंत्रीच पाहिजेत असं नाही. पदाधिकारीही जनता दरबार घेऊ शकतात. त्यामुळे एकनाथ शिंदेंना आव्हान वैगेरे असं काही नाही असंही म्हस्केंनी म्हटलं

ठाण्यात होमग्राऊंडवर भाजपा करतंय एकनाथ शिंदेंची कोंडी?; शिंदेसेनेची उघड नाराजी
ठाणे - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला ठाण्यात भाजपा नेते मंत्री गणेश नाईक जनता दरबार घेणार आहे. त्यावरून महायुतीत भाजपा-शिवसेना यांच्यात कुरघोडीचं राजकारण सुरू असल्याची चर्चा आहे. त्यातच जर कुणाला एकटं लढायचे असेल तर आम्हीही स्वबळावर लढण्यास तयार आहोत असा इशारा खासदार नरेश म्हस्केंनी भाजपाचं नाव न घेता दिला आहे.
खासदार नरेश म्हस्के म्हणाले की, महायुती म्हणून आम्ही विधानसभा, लोकसभा लढलो, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून लढायच्या आहेत. त्यातूनही कुणाला जर एकटं लढायचं असेल तर ती लढण्याची तयारी आमची आहे. २५ वर्ष आम्ही ठाण्यात सत्ता राखली आहे. कुणाला एकटं लढायचे असेल तर हा निर्णय त्यांचा आहे. आम्ही आतापर्यंत शिवसेना आणि इतर पक्ष म्हणून लढलो आहे. महायुतीत कुणी मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये. कार्यकर्त्यांना समजावणं हे पक्ष नेत्याचे काम असते. तरीही स्वबळावर लढण्याची आमचीही तयारी आहे असं त्यांनी सांगितले.
त्याशिवाय एकनाथ शिंदेंना शह देण्याचा कुणी प्रयत्न करतंय असं वाटत नाही. पालघरचे पालकमंत्री आहेत ते ठाण्यात जनता दरबार घेत असतील तर आमचेही मंत्री पालघरमध्ये जनता दरबार घेतील. जनता दरबार घेतल्याने फार मोठं काही होणार नाही. जनता दरबार किंवा गणेश नाईकांनी जे काही विधान केले असेल तर त्यांच्या पक्षाची बाजू मांडली असेल. प्रत्येक पक्ष निवडणुका लढण्यासाठी असतात. जनता दरबार घेण्यासाठी मंत्रीच पाहिजेत असं नाही. पदाधिकारीही जनता दरबार घेऊ शकतात. त्यामुळे एकनाथ शिंदेंना आव्हान वैगेरे असं काही नाही असंही म्हस्केंनी म्हटलं.
दरम्यान, एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांनीही राज्यात जाऊन जनता दरबार घेतले पाहिजे. अजित पवारांच्या मंत्र्यांनीही जनता दरबार घेतले पाहिजे. शेवटी सरकारमधील मंत्र्यांनी जनता दरबार घेतल्याने भले कुणाचे होणार, जनतेचेच होणार आहे. जिल्ह्याचा फायदा होईल. लोकांचे प्रश्न सुटतील. या सरकारचा मंत्री हा राज्याचा मंत्री असतो तो कुठल्याही जिल्ह्यात जाऊन जनता दरबार घेऊ शकतो. कुठल्याही जिल्ह्यात जाऊन कारभार करू शकतो. मी महसूल मंत्री आहेत त्यामुळे राज्यातील कुठल्याही जिल्ह्यात जाऊन काम करू शकतो. त्याला कुणी अडवलं नाही असं भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिले आहे.
भाजपा नेमणार समन्वय संपर्क मंत्री
महायुती म्हणून आम्ही राज्यात लढणार आहोत. परंतु प्रत्येक भागातील कार्यकर्त्यांची भावना मांडावी लागते. राज्यात महायुती म्हणून लढलं पाहिजे. लोकसभा, विधानसभेला युतीत लढलो. लवकरच भाजपा आणि शासनाचा समन्वय साधण्यासाठी समन्वयक मंत्री करतोय. आमचे जे पालकमंत्री आहेत ते कुठल्याही जिल्ह्याचे समन्वयक असतील जेणेकरून त्या जिल्ह्यातील संघटनेचा आणि सरकारचा संपर्क होईल. त्यासाठी आम्ही लवकरच नेमणूक करतोय अशी माहितीही बावनकुळेंनी दिली.
नाईक - शिंदे संघर्ष कायम
एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात वनमंत्री जनता दरबार घेणार आहेत. विशेष म्हणजे गणेश नाईक जनतेशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे भाजपा शिवसेनेवर कुरघोडी करतंय का असा प्रश्न पडला आहे. गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यातील संघर्ष फार जुना आहे. नाईकांना मंत्रिपद देऊन भाजपाने ठाणे जिल्ह्यात प्राबल्य वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात नाईक पुन्हा ठाण्यात राजकीय वजन वाढवण्याचा प्रयत्न करतायेत. कार्यकर्त्यांनी निवडणुकीला तयार राहावे. जर स्वबळाचा नारा दिला तर तयारी असावी असं नाईकांनी कार्यकर्त्यांना सांगितल्याचे पुढे आले आहे.