“राऊतांनी बेताल विधाने सिद्ध करुन दाखवावी, राजकीय संन्यास घेईन”: राधाकृष्ण विखे पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 06:21 PM2024-02-22T18:21:15+5:302024-02-22T18:21:47+5:30
Radhakrishna Vikhe Patil: संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झालेला असून त्यांना मानसोपचाराची गरज आहे, असा पलटवार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.
Radhakrishna Vikhe Patil: महानंद डेअरीवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकार आणि भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांवर राधाकृष्ण विखे पाटील यांनी उत्तर देताना संजय राऊतांवर पलटवार केला आहे. संजय राऊतांनी बेताल विधाने सिद्ध करुन दाखवावी. तर राजकीय संन्यास घेईन, असे प्रतिआव्हान राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
महानंदाच्या गोरेगाव येथील ५० एकर जमीन विक्रीसंदर्भात महसूल मंत्री विखे यांच्यासह मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री असे चौघेजण या व्यवहारातील ‘सौदागर’ आहेत. महानंदाचे अध्यक्ष कोण होते? राधाकृष्ण विखे यांचे सख्खे मेहुणे. ‘मेहुणे, मेहुणे सख्खे पाहुणे आणि पाहुण्यांना दिले महानंदा’ असा टोला संजय राऊत यांनी लगावला. राज्यातील सहकारी दूध संस्थांची शिखर संस्था असलेल्या महानंद डेअरीच्या चेअरमनसह १७ संचालकांनी राजीनामा दिल्यानंतर राज्य सरकारची ही संस्था गुजरातकडे जाणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले.
संजय राऊतांनी बेताल विधाने सिद्ध करुन दाखवावी
संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झालेला असून त्यांना मानसोपचाराची गरज आहे. अशी कुठली पन्नास एकर जमीन ते म्हणतात ती दाखवावी. त्यांच्याविरुद्ध अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार आहे. आजपर्यंत काही गोष्टींचे पथ्य आम्ही पाळतोय मात्र सवंग लोकप्रियतेसाठी असे आरोप करणार असतील आणि बदनामी करणार असतील तर त्याचे परिणाम त्यांनी भोगायची तयारी ठेवावी. संजय राऊत यांनी त्यांच्या जीवनात काय व्यक्तिगत उद्योग केले कोणाचे घर उद्ध्वस्त केले त्याचे नाव मला सांगावे लागतील. संजय राऊत यांनी केलेली बेताल वक्तव्ये सिद्ध करून दाखवावीत. मी राजकीय संन्यास घेईन, असे प्रतिआव्हान राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
दरम्यान, संजय राऊत यांच्यासारखे सुपारी बाज लोक पिसाळलेला कुत्र्यासारखे अंगावर धावू लागले आहेत. राऊत यांच्या विधानावर मी भाष्य करणे आवश्यक नाही त्याला तुम्ही फार गांभीर्याने घेऊ नका, या शब्दांत विखे पाटील यांनी पलटवार केला.