शिवसेनेकडून आता भाजपा मंत्रीही लक्ष्य
By admin | Published: February 9, 2017 01:30 AM2017-02-09T01:30:33+5:302017-02-09T01:30:33+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लक्ष्य केलेले असताना आता
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लक्ष्य केलेले असताना आता शिवसेनेने भाजपाच्या आजीमाजी मंत्र्यांकडे मोर्चा वळवून त्यांच्या कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची पुस्तिका काढली आहे.
शिवसेनेच्या कार्यालयातून देण्यात येत असलेल्या ‘घोटाळेबाज भाजपा’ या पुस्तिेकत माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे, शिक्षण मंत्री विनोद तावडे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट,अहमदनगरचे खासदार दिलीप गांधी यांचे फोटो मुखपृष्ठावर छापून त्यांची नावे कोणत्या गैरव्यवहारात आहेत याचा उल्लेख केला आहे. आतील पानावर आदिवासी विकास मंत्री विष्णु सावरा, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, गृहराज्य मंत्री डॉ.रणजित पाटील, कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, माजी आमदार प्रवीण दरेकर, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचे फोटो आतील पानांत गैरव्यवहारांच्या उल्लेखांसह दिलेले आहेत. माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांचे नाव चिक्की घोटाळ्यात आले होते. त्याचा केवळ एका ओळीत उल्लेख केला आहे.
‘आमच्या लोकांना पैसे कसे खायचे हेच कळत नाही’ हे पंकजा यांचे वादग्रस्त विधान तेवढे नमूद केले आहे. प्रमोद महाजन हे माहिती प्रसारण मंत्री असतानाच्या काळात रिलायन्सच्या सोबतीने घोटाळा झाला होता याची आठवण मात्र करून देण्यात आली आहे. या शिवाय, केंद्रीय भृपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे नावाचा पुण्यातील एका जमीन घोटाळ्याप्रकरणी उल्लेख आहे.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीदरम्यान आज पत्रकारांना प्रचारसाहित्याची किट देण्यात आली, त्यात ‘घोटाळेबाज भाजपा’ ही पुस्तिकाही होती. तथापि, त्यावर प्रकाशकाचे नाव नाही. याबाबत पक्षाच्या जनसंपर्क प्रमुखांकडे विचारणा केली असता, त्यांनी स्पष्ट केले की, ही पुस्तिका शिवसेनेने छापलेली नाही. केवळ कार्यकर्त्यांच्या माहितीस्तव ती देण्यात आली आहे.
मोदी सरकारचे घोटाळे
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार हे घोटाळेमुक्त असल्याचा दावा भाजपा करीत आली आहे. त्यांचाच मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने मात्र, केंद्रातील घोटाळ्यांची जंत्री या पुस्तिकेत सादर केली आहे.
त्यात छत्तीसगडमधील ३६ हजार कोटींचा तांदूळ घोटाळा, मध्य प्रदेशमधील व्यापम घोटाळा, राजस्थानमधील खाण गैरव्यवहार, ललित गेट घोटाळा, स्पेक्ट्रम लिलावात झालेले देशाचे प्रचंड आर्थिक नुकसान या विषयांवरून केंद्र सरकार आणि भाजपाप्रणित राज्यांना लक्ष्य करण्यात
आले आहे.
नाशिक, पुण्यातील गुंडांना भाजपात दिलेला प्रवेश, आ. आशिष शेलार यांच्यावर नवाब मलिक आणि प्रीती शर्मा मेनन यांनी केलेले कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यांचे आरोप, अभिनेत्री खा.हेमामालिनी यांना नाममात्र दरात शासनाचा मोठा भूखंड देणे, नागपुरात वाढलेली गुन्हेगारी यांचा उल्लेख करताना खा.किरीट सोमय्या यांनाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले आहे.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची कारकिर्द कशी वादग्रस्त राहिली आहे, यावर सहा पाने खर्ची घालण्यात आली आहेत.