“प्रशासनाला बाजूला ठेवा, वेळ आणि जागा सांगा, मग…”; भाजपाचं राऊतांना खुलं चॅलेंज
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 12:21 PM2022-02-09T12:21:06+5:302022-02-09T12:21:25+5:30
प्रविण राऊत यांना अटक झाल्यामुळे साहाजिकच राऊतांचे मानसिक संतुलन ढासळले आहे असा आरोप भाजपाने केला.
मुंबई – आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं शिवसेना-भाजपा यांच्यात जोरदार खडाजंगी सुरु झाली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत(Shivsena Sanjay Raut) यांनी लेटर बॉम्ब टाकत भाजपावर निशाणा साधला आहे. त्याला आता भाजपा नेत्यांनीही प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. जनाब संजय राऊत मुंबई ही तुमची जहागिर नाही, घरात घुसायची भाषा करता पण स्वत:च्या घरात तुमची किती किंमत आहे हे आम्हाला चांगलं माहिती आहे अशा शब्दात भाजपा आमदार अमित साटम(BJP Amit Satam) यांनी संजय राऊतांना टोला लगावला आहे.
अमित साटम म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारमध्ये आपली जागा फक्त खलिता वाहणाऱ्या काशिदाची आहे. भ्रष्टाचार करायचा आणि तो बाहेर काढला म्हणून किरीट सोमय्यांवर भेकड हल्ले करायचे असा प्रकार संजय राऊतांनी सुरु केला आहे. त्यात प्रविण राऊत यांना अटक झाल्यामुळे साहाजिकच राऊतांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. हुल्लडबाजी ही भाजपची संस्कृती नव्हे. पण तुमच्या सारख्यांना तुमच्याच भाषेत बोलायचे तर तुम्ही एकदा प्रशासनाला बाजूला ठेवा, वेळ आणि जागा सांगा, मग भाजप कार्यकर्त्यांच्या मनगटातली ताकद पाहा. हे या मराठ्याचं तुम्हाला खुलं आव्हान आहे असा इशारा साटम यांनी शिवसेना नेते संजय राऊतांना दिलं आहे.
मुंबईचा दादा शिवसेनाच – राऊत
केंद्रातील मोदी सरकार हे विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत आहे. केंद्रीय तपास यंत्रणा ह्या गुंडांच्या टोळ्या झाल्या आहेत. सरकार पाडण्यासाठी माझ्यासह शरद पवारांनाही धमक्या दिल्या गेल्या आहेत. मात्र या सर्वांची मी पोलखोल करणार आहे. आम्हाला तुरुंगात टाकण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. मात्र आम्हाला तुरुंगात टाकलं तर तुम्हालाही तुरुंगात जावं लागेल, असा रोखठोक इशाराच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.
तसेच ही मुंबई आहे. मुंबईचा दादा शिवसेना आहे. आता तुम्ही शिवसेनेची ताकद पाहाच. देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) आवाहन करतोय. त्यांना माहिती आहे मला काय सांगायचे आहे ते. आम्ही तुमच्या घरात घुसलो तर तुम्हाला नागपुरात जाता येणार नाही. आता पुढची पत्रकार परिषद शिवसेना भवनात आणि त्यानंतरची पत्रकार परिषद ही ईडीच्या कार्यालयासमोर घेणार आहे. त्यात मोठा गौप्यस्फोट करणार, असे संकेतही संजय राऊत यांनी दिले आहेत.