"आरक्षण न देणाऱ्यांवर तुम्ही का बोलत नाहीत?"; भाजपचा मनोज जरांगेंना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 03:03 PM2024-07-25T15:03:24+5:302024-07-25T15:06:50+5:30
Manoj Jarange Patil : ज्यांनी मराठा समाजाला कधी आरक्षण दिले नाही त्यांच्या विरोधात जरांगे पाटील कधीच चकार शब्द काढत नाहीत, अशी टीका भाजप आमदार आशिष शेलार यांनी केली.
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत. मनोज जरांगेंकडून देवेंद्र फडणवीस यांना सातत्याने लक्ष्य केलं जात आहे. देवेंद्र फडणवीस यांचा मला तुरुंगात टाकण्याचा कट आहे. जर मला त्यांनी तुरुंगात टाकलं तर भाजप सत्तेत येऊ देऊ नका, अशा शब्दात मनोज जरांगेंनी टीका केली होती. जरांगेंच्या आरोपांवर आता भाजपने प्रत्युत्तर दिलं आहे. महाराष्ट्रात हिंदूंच्या बाजूने बोलणाऱ्या भाजपाला संपवण्याचे मोठे षडयंत्र रचले जातेय, असा गंभीर आरोप मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी केला आहे.
"मराठा समाजाच्या मागणीला भाजपचे संपूर्ण समर्थन असून किंबहुना मराठा समाजाला आरक्षणा देण्याची भूमिका विरोधी पक्षाने केवळ भाषणात मांडली. त्याचे कायद्यात रूपांतर करण्याचं काम देवेंद्र फडणवीस आणि भाजपने केले आहे. जरांगे पाटील यांना त्यांचा विसर का पडलाय? जरांगे पाटील जोपर्यंत समाजाच्या आरक्षणाच्या भूमिकेबद्दल बोलत आहेत, तोपर्यंत आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. पण ज्या वेळेला ती मर्यादा सोडून ते राजकीय भाष्य करतायेत त्यावेळेला आम्हालाही मर्यादा सोडाव्या लागतील," असा थेट इशारा आशिष शेलार यांनी दिला.
"जरांगे पाटील हे या आंदोलनकर्त्यांच्या मागणीचा नेतृत्व करतात ते योग्यच, पण याचा अर्थ सकल मराठा समाज म्हणजे जरांगे पाटील आहेत असं मानण्याचे कारण नाही. म्हणून जरांगे पाटील म्हणजेच सगळे मराठा आणि सगळेच मराठा दावणीला बांधले जातील, हा जर त्यांचा समज झाला असेल तर तो त्यांनी दुर करावा, हे त्यांना नम्रपणे सांगतो. समजाच्या आरक्षणाची भूमिका ते मांडतायेत लोकशाहीमध्ये त्यांना अधिकार आहे. सरकार त्यांच्या सगळ्या मानलेल्या भूमिकेंवर सकारात्मक विचार करते आहे. पण ज्यांनी आरक्षण दिले, टिकवले, त्याचे फायदे काही विद्यार्थ्यांना आणि युवकांना मिळाले, त्यांच्यावर ते टीका करतात आणि ज्यांनी आरक्षण दिलंच नाही त्यांच्याबद्दल एक चकार शब्द काढायला तयार नाहीत? अगदी स्पष्ट सांगायचं झालं तर शरद पवार मुख्यमंत्री होते तेव्हा मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही. जरांगे पाटील आपण कधी त्यांच्यावर बोललात का? शरद पवारांच्या समर्थनाने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना या आरक्षणाचा निर्णय कोर्टात टिकला नाही. जरांगे पाटील आपण कधी उद्धव ठाकरेंवर, शरद पवारांवर, नाना पटोले यांच्यावर कधी बोललात का?, टीका केलीत का?," असा सवाल आशिष शेलार यांनी केला.
हिंदू हिताचे बोलणाऱ्यांना संपवण्याचे षडयंत्र
"आम्ही गेल्या काही दिवसांपासून पाहतो एक सलगता एकरूपता दिसते आहे. आधी सुरु होते काँग्रेसच्या, राष्ट्रवादीच्या, उबाठा सेनेच्या नेत्यांच्या वक्तव्यामध्ये आणि तीच काही संस्था, संघटना, अर्बन नक्षल आणि काही आंदोलनकर्ते आणि आता जरांगे पाटील या सगळ्यांच्या बोलण्यात एक वाक्यता, एकरूपता दिसते आहे. ती म्हणजे भाजपला संपवा. प्रत्यक्ष मनोज जरांगे पाटील तर हे बोललेच, देवेंद्र फडणवीस यांना संपवा म्हणून. भाजपला संपवा याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये हिंदू हिताची गोष्ट बोलणारा माणूस राहूच नये, हिंदुहितासाठी बोलणारा पक्ष वाचू नये. मराठा समाज हे सुध्दा पाहतोय. हे एक मोठे षडयंत्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या रस्त्यावरून भटकलेल्या जरांगे पाटील यांनी आत्मपरीक्षण करावे," असा सल्लाही शेलार यांनी दिला.