पुरात नुकसान झालेल्या गणेशमूर्तीकरांना शासनाने मदत करावी; आशिष शेलारांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 08:26 PM2023-07-21T20:26:54+5:302023-07-21T20:27:38+5:30
मुंबई, रायगडसह अनेक जिल्ह्यात पावसाच्या तडाख्याने जनजीवन विस्कळीत
Maharashtra Monsoon Session, Ashish Shelar: राज्यात गेल्या पाच-सहा दिवसांपासून पावसाने प्रचंड धुमाकूळ घातला आहे. मुंबईसह रायगड, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि वसई विरार, पालघर या जिल्हांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. त्यामुळे बरेच ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले. या भागांमध्ये गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या गणेशमूर्ती बनवल्या जातात. अनेकांची छोट्या प्रमाणावरील उद्योगही आहेत. तर काहींचे कारखाने आहेत. पण मुंबईसह ठाणे, रायगडमधे झालेल्या मुसळधार पावसामुळे गणेशमूर्ती कारखान्यात पाणी शिरून मोठे नुकसान झाले आहे. त्यांना शासनाने मदत करावी, अशी विनंती आमदार आशिष शेलार यांनी अधिवेशनात केली. गणेशमूर्तीकरांच्या झालेल्या नुकसानभरपाई बाबत आशिष शेलारांनी औचित्याचा मुद्दा सभागृहात उपस्थितीत केला.
"सरकारने आग्रह धरलेल्या शाडूच्या आणि मातीच्या गणेश मूर्तींचे राज्यात सुरू असलेल्या पावसामुळे नुकसान होत आहे. पेण मध्ये अनेक कारखान्यात पाणी शिरूर मोठे नुकसान झाले आहे. या मूर्तीकारांना सरकारने मदत करावी तसेच पीओपीच्या मूर्तीकारांवर सुरू असणारे धाडसत्र बंद करावे, एकिकडे पावसाने शाडू मातीच्या मुर्त्या पुराच्या पाण्यात विरघळून गेल्या आहेत. दुसरीकडे सरकार शाडूमातीच्याच मुर्ती असाव्यात याबाबत आग्रह धरते आहे. त्यामुळे याबाबत लवकर भूमिका स्पष्ट करा अन्यथा गणेशोत्सवात मुर्तीच उपलब्ध होणार नाहीत", अशी भिती आशिष शेलारांनी व्यक्त केली.